मुंबई 29 मार्च : ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात महायुतीत निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी आज किरीट सोमय्या मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. भाजपचे कोकण समन्वयक आमदार प्रसाद लाड सोमय्यंना घेऊन मातोश्रीवर दाखल होणार आहेत. त्यासाठी त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटण्यासाठी वेळ ही मागीतली आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तर आजच हा वाद मिटण्याची शक्यता आहे.
प्रसाद लाड यांना मात्र अजूनही मातोश्रीने वेळ दिलेली नाहीये. कारण प्रसाद लाड यांच्या सोबत भाजप खासदार किरीट सोमय्या देखील असणार आहेत. किरीट सोमय्या यांना घेउन प्रसाद लाड मातोश्रीवर दाखल होणार आहेत. पण त्यांना अजून वेळ दिली नसल्याची माहीती मिळतेय. उद्धव यांची भेट घेऊन सोमय्या माफी मागतील आणि वादावर पडदा पडेल असंही बोललं जात आहे.
भाजप शिवसेनेमध्ये दुरावा असतानाच्या काळात सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर व्यक्तिगत हल्ला केला होता. त्यामुळे ठाकरे दुखावले गेल्याने शिवसैनिकांच्या भावना तीव्र असल्याचं बोललं जातेय. मात्र भाजपच्या अन्य नेत्यांनीही आता नवा मुद्दा उपस्थित केलाय. संजय राऊत आणि इतर नेत्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीसांवर वाट्टेल तसे आरोप केले. त्यामुळे भाजपचे कार्यकर्तेही दुखावले गेले आहेत. त्यामुळे जास्त न ताणता कामाला लागले पाहिजे असं भाजपचे म्हणणे आहे.
मुंबई 29 एप्रिलला चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. या मतदारसंघात सोमय्या यांचं काम चांगलं असल्याने त्यांना तिकीट दिलं नाही तर जागा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांनाच तिकिट मिळावं असा भाजपचा आग्रह आहे.