शेतकरी कामगार पक्षासाठी ही 'अस्तित्वा'ची लढाई ठरणार

शेतकरी कामगार पक्षासाठी ही 'अस्तित्वा'ची लढाई ठरणार

काळ बदलला तसा शेकापं बदललेला नाही. त्याचबरोबर तरुणांनाही आकर्षीत करू शकलेला नाही. नव्या लोकांनी पक्षात येणं हे त्यांच्यापुढचं मोठं आव्हान आहे.

  • Share this:

विनय म्हात्रे, नवी मुंबई 10 एप्रिल : निवडणूक ही राजकीय पक्षांसाठी निकराची लढाई असते. काही दशकांपूर्वी महाराष्ट्रात प्रभाव असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाची सध्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. शहरी मतदारांवर शेकापचा प्रभाव पडत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांना मदत करून उभारी घेण्याचे शेकापचे प्रयत्न सुरू आहेत.

मर्यादित प्रभाव

कधीकाळी राज्यात सर्वदूर पसरलेला शेतकरी कामगार पक्ष आता सातारा आणि रायगड जिल्ह्यापुरताच मर्यादित राहिला आहे. विधानसभेत विरोधी पक्षाची भूमिका बजावणारा शेकाप रायगडच्या पनवेल, उरण आणि अलिबाग याच दोन तालुक्यात शिल्लक राहिलाय. पण तिथंही शेकाप सत्ता आणू शकली नाही. परिणामी आता राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत मदत करून विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्याचे शेकापचे प्रयत्न आहेत.

सत्तेपासून दूर

पनवेल महापालिका निवडणुकीत शेकापसोबत दोन्ही काँग्रेस एकत्र होत्या. मात्र त्याही वेळी भाजपची घोडदौड शेकापला रोखता आली नाही. त्यामुळे आता पार्थ पवार यांच्या विजयावर शेकापची पुढील वाटचाल अवलंबून असणार आहे. सध्या विधानसभेत शेकापचे फक्त गणपतराव देशमुख हेच आमदार आहेत. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने जयंत पाटील विधान परिषदेवर आहेत.

पाटलांचं वर्चस्व

शेकापचे ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील आता सक्रिय राजकारणातून निवृत्त आहेत. जयंत पाटील यांनी शेकापवर पूर्ण नियंत्रण मिळवलं आहे. त्यामुळेही अंतर्गत धुसफूस सुरू असते. असं असताना हा पक्ष  तरुणांना आकर्षीत करू शकलेला नाही.

रायगड जिल्ह्याचं जसजसं शहरीकरण होत गेलं. तस तसं शेकपला घरघर लागत गेली. आता शेकापला नव्याने उभारी घ्यायची असेल तर त्यांना येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुबड्याची गरज ही लागणार आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे मावळचा निकाल हा शेतकरी कामगार पक्षासाठीही महत्त्वाचा आहे.

First published: April 10, 2019, 6:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading