'इनकमिंग' सुरुच, काँग्रेसच्या माजी आमदाराच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश

'इनकमिंग' सुरुच, काँग्रेसच्या माजी आमदाराच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश

जगताप यांच्या भाजप प्रवेशामुळे निवडणुकीत भाजपचा दावा आणखी मजबूत झाला असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

विरेंद्र उत्पात, करमाळा 31 मार्च : करमाळा  तालुक्यातील काँग्रेसचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे पुत्र शंभुराजे जगताप यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जगताप भाजपमध्ये आले. जगताप यांच्या भाजप प्रवेशामुळे निवडणुकीत भाजपचा दावा आणखी मजबूत झाला असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

या वेळी व्यासपीठावर कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते. अंतर्गत राजकारणामुळे जगताप यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे असं बोललं जाते.

काय झालं माढ्यात

अखेर माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने आपली उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने रणजीत नाईक-निंबाळकर यांना माढातून उमेदवारी दिली आहे.माढातून कोणाला उमेदारी द्यायची यावरून गेल्या काही दिवासांपासून जोरदार चर्चा सुरु होती.भाजपने आज लोकसभेसाठीची नवी उमेदवारी जाहीर केली. यात माढासह अन्य 11 जागांवरील उमेदवारांच्या नावाचा समावेश होता. माढ्यात आता राष्ट्रवादीचे संजय शिंदे विरुद्ध रणजितसिंह नाईक-निंबाळकर असा सामना रंगणार आहे.सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष असलेल्या रणजितसिंह यांनी काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

जानकरांचा पाठिंबा

राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. अशातच आता धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर हेदेखील माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण मी निवडणूक लढवणार नसून युतीच्या उमेदवाराला म्हणजेच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणा आज उत्तम जानकर यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली आहे.

'धनगर समाजाला जो पर्यंत जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही तो पर्यंत कोणतीही पद घेणार नाही. धनगर समाजाला भाजपच न्याय देऊ शकेल. मला आणि गोपिचंद पडळकर यांना तिकीट मिळावं अशी इच्छा होती. मी निवडणूक लढवू शकतो पण निवडून येण्याची खात्री नाही. त्यामुळे समाजाचं हित भाजपबरोबर जाण्यात आहे, म्हणून मी युतीला पाठिंबा देत आहे,' अशी घोषणा उत्तम जानकर यांनी केली आहे.

आरक्षणाचा प्रश्न

धनगर समाजाचे नेते असलेल्या उत्तम जानकर यांनी लोकसभेबाबतचा निर्णय घेण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. कार्यकर्त्यांचा जो निर्णय असेल तो मान्य करणार, अशी भूमिका आता उत्तम जानकर यांनी याआधीच स्पष्ट केली होती.

माढ्यात भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांच्यामध्ये लढत होत आहे. माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची चार लाख मते आहेत. त्यामुळे उत्तम जानकर यांचा पाठिंबा भाजपसाठी फायद्याचा ठरणार आहे. दरम्यान, धनगर समाजाच्या मागण्यांकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे उत्तम जानकर यांना समाजाकडून निवडणूक लढण्याचा दबाव आहे, असं सांगण्यात येत आलं होतं.

First published: March 31, 2019, 6:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading