अहमदनगर, प्रफुल्ल साळुंखे 20 एप्रिल : देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात असल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे. राजकीय आरोप - प्रत्यारोप आणि केलेल्या विकास कामांच्या जोरावर सत्ताधारी मतं मागत प्रचार करत आहे. या साऱ्या बाबींचा मोगावा, लेखाजोगा 'न्यूज18 लोकमत' घेत आहे. यावेळी जाहीर सभेदरम्यान राम शिंदे यांनी कुकडीचं पाणी आम्ही कसं आणलं, मतदार संघात जलयुक्त शिवारची कामं कशी झाली याचा लेखाजोगा मांडला. शिवाय, मतदारसंघात 150 कोटींची जलसंधारणाची कामं केल्याचा दावा शिंदे यांनी केला. तर, मतदार संघातील एकाही गावात पाण्याचा टँकर नसल्याचा दावा देखील राम शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केला. पण, वास्तव काही वेगळंच होतं.
Ground Report: गिरीश महाजन जलसंपदा मंत्री तरीही जळगाव जिल्हा तहानलेलाच..
काय आहे नेमकी स्थिती
मुळात राम शिंदे यांच्या दाव्यात पूर्णपणे फोलपणा असल्याचं दिसून आलं. कारण, सभेनंतर कर्जत तालुक्यात फेरफटका मारल्यानंतर दिसलेली परिस्थिती पाणीबाणीची होती. अनेक ठिकाणी टँकर आणि पाण्यासाठी उडालेली झुंबड गावागावांत दिसून आली. कर्जतपासून केवळ 19 किमी अंतरावर असलेल्या गावात दिकसल गावात मात्र वेगळंच चित्र होतं. कारण, 1400 लोकसंख्या असलेल्या गावात दिवसातून केवळ एक पाण्याचा टँकर येतो. टँकरद्वारे आणलेलं पाणी विहीरीत टाकलं जातं. पण, एवढं करून देखील पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट ही ठरलेलीच. दिकसल गावात दिसणारं हे चित्र संपूर्ण तालुक्यात आहे.