निवडणुकीच्या धामधुमीत नेत्यांनी दुष्काळ कुठे पळवला?

निवडणुकीच्या धामधुमीत नेत्यांनी दुष्काळ कुठे पळवला?

राज्यात सध्या दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. पण, निवडणुकीच्या या धामधुमीत मात्र नेत्यांच्या तोंडी त्याचा साधा उल्लेख देखील दिसत नाही.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सत्ताधाऱ्यांसह विरोधक देखील प्रचारामध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्जिकल स्ट्राईक, राष्ट्रीय सुरक्षा आदी मुद्यांवर सध्या निवडणूक लढवली जात आहे. पण, निवडणुकीच्या धामधूमीत राज्यातील दुष्काळ मात्र गायब झाला की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण,पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थिती यावर देशपातळीवरचा एकही नेता सभांमध्ये बोलायला तयार नाही. विरोधी पक्ष आणि सरकार दोन्ही बाजू दुष्काळाची समस्या आपल्या प्रचारातून हद्दपार करतान दिसत आहेत.

राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरचे नेते आपल्या प्रचार दौऱ्यांमध्ये आणि जाहीर सभांमध्ये प्रामुख्याने घेत असलेले मुद्दे जनतेला महत्त्वाचे वाटतात की, पाण्याचा प्रश्न त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा आहे हे पाहायचं ठरवलं. 'नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात निवडणुकीची चर्चाच नसल्याचं चित्र आहे.सध्या दुष्काळी परिस्थिती, चारा-पाण्याची भीषण टंचाई, रोजगार आदींमुळे शेतकऱ्यांसोबत सर्व सामान्य नागरिक हैराण आहेत. गेल्या आठवड्यात मालेगावात भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनोमीलन मेळावा झाला या मेळाव्यासाठी राज्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल आदी आले होते. त्यावेळी त्यांनी पुलवामा, मै भी चौकीदार यासह इतर भावनिक मुद्यांवर जोर दिला. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या उपस्थित केले नसल्याचे पाहून शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली', अशी माहिती 'न्यूज18 लोकमत'चे नाशिकमधील प्रतिनिधी बब्बू शेख यांनी दिली.

पाण्यासाठी वणवण

ऐन पावसळ्यात वरुणराजानं पाठ फिरवली त्यामुळे खरीप पिकांवर संक्रात आली. तर, पाण्याअभावी रब्बी पिकं देखील धोक्यात आली. नदी-नाले कोरडे ठाक पडले. विहिरींनी तळ गाठला. पाण्यासाठी वणवण सुरू झाली. पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढवलेली गुरं आत जगवायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला. पाण्याअभावी, चाऱ्या अभावी जनावरं विकावी लागली. रखरखत्या उन्हात पाण्यासाठी होणारी पायपीट वाढली. गावा-वाड्यांमधून आवाज उठला आणि सरकारला देखील त्याची दखल घ्यावी लागली. अखेर सरकारनं दुष्काळ जाहीर केला. टँकरच्या पाण्यावर सारी मदार आली. पण, प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये दुष्काळ हरवला की काय? सत्ताधाऱ्यांना याचं गांभीर्य आहे का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

drought situation in maharashtra 1

दुष्काळ जणू पाचवीलाच पुजलेला

दुष्काळाच्या स्थितीवर ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांना विचारले असता त्यांनी 'सरकार शेतकऱ्यांबद्दल फारसं गंभीर नाही. काही ठिकाणी चारा छावण्या सुरू आहेत. पण, त्यामध्ये काही संस्था, दानशूर व्यक्तींनी देखील पुढाकार घेतला असल्याची माहिती दिली. तसेच सत्तेवर आल्यानंतर देखील सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांच्या बाजूनं आहे का? हे सरकार शेतकऱ्यांसाठी खरंच काही करतंय का?' असा सवाल केला.

कधी ओला तर कधी सुका दुष्काळ हे चित्र जणू शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजलेलं. सरकार बदललं पण शेतकऱ्यांच्या स्थितीत काही फरक पडला का? हा खरा प्रश्न आहे. राज्यात सध्या लोकसभा प्रचाराची धामधुम पाहायाला मिळत आहे. पण, प्रचारातील मुद्दे पाहता दिलेल्या वचनाचं काय झालं? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रचारसभांमध्ये आश्वासनांची खैरात केली जात आहे. पण, दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल कोण बोलणार? हा सवाल बळीराजाला पडला आहे. शहरी भागात जरी विकास, राष्ट्रीय सुरक्षा या मुद्यांवर चर्चा होत असली तरी गावची स्थिती मात्र पूर्ण वेगळी आहे. कारण, गावच्या पारावर, चावडीवर चर्चा सुरू आहे ती दुष्काळाची! आमचे प्रश्न कोण सोडवणार याची? आमच्या प्रश्नांना हात कोण घालणार? असा सवाल आता केला जात आहे. दुष्काळाला कायमचा हद्दपार करण्यासाठी करावा लागणाऱ्या उपाययोजनांवर देखील ग्रामीण भागात चर्चा सुरू झाली आहे. पण, प्रचाराच्या रणधुमाळीत मात्र दुष्काळ पार हरवून गेला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत नेत्यांनी दुष्काळच पळवला की काय? असा सवाल आता निर्माण झाला आहे.

First published: April 13, 2019, 7:04 PM IST

ताज्या बातम्या