ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची कर्मचाऱ्यांसोबत रंगली मद्यपार्टी; अशी झाली पोलखोल

ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची कर्मचाऱ्यांसोबत रंगली मद्यपार्टी; अशी झाली पोलखोल

एकीकडे बार्शी तालुक्यातील वैराग गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने संपूर्ण सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आहे.

  • Share this:

सोलापूर, 29 मे: एकीकडे बार्शी तालुक्यातील वैराग गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने संपूर्ण सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आहे. दुसरीकडे वैराग ग्रामपंचायतीत अधिकारीच मद्यपार्टी करताना आढळून आले आहेत.

वैराग ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच ग्रामविकास अधिकाऱ्यांसह बांधकाम अभियंता, कार्यालयीन अधिक्षक, कारकून तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचाऱ्यांनी मद्यपार्टी केल्याची पोलखोल झाली आहे.

हेही वाचा.. लग्नानंतर तब्बल 10 वर्षांनी त्यांच्या घरात हलला होता पाळणा, पण कोरोनानं...

वैराग ग्रामपंचायतीचे सदस्य अरुण सावंत यांनी या संपूर्ण प्रकाराची पोलखोल केली आहे.  सोलापूर जिल्ह्यात दारुबंदी असतानाही या अधिकाऱ्यांनी दारू कोठून आणली, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकीकडे कोरोनाशी संपूर्ण जिल्हा लढा देत आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 822 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी 72 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. त्यातच अधिकाऱ्यांचे हे वर्तन अतिशय धक्कादायक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतेय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वैराग पोलिस स्टेशनमध्ये भादंवि. 268, 270,188, प्रतिबंधात्मक कायदा 85(1) कलमानुसार तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामविकास अधिकारी अनिल बारसकर, ग्रामपंचायत कर्मचारी विलास मस्के (कार्यालयीन अधीक्षक), राम जाधव (बांधकाम अभियंता), अमजद शेख (हसन अली शेख) (कारकून) अशी आरोपींची नावं आहेत.

हेही वाचा.. कोरोनाबाबत राज्यात सत्ताधाऱ्यांची 'अशी ही बनवाबनवी', भाजप नेत्यानं डागली तोफ

वैराग येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असताना जिल्हाधिकारी यांनी वैराग भाग सील केलं आहे. वैराग ग्रामपंचायत कार्यालय येथे 28 मे रोजी सायंकाळी 4 वाजता ग्रामपंचायत कार्यालयातच आरोपींना मद्यपान करताना रंगेहात पकडण्यात आले. आता त्यांच्यावर प्रशासन काय कारवाई करतं याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

First published: May 29, 2020, 5:03 PM IST

ताज्या बातम्या