कन्हैया खंडेलवाल, प्रतिनिधीहिंगोली, 14 जून : हिंगोली जिल्ह्यातील गेल्या तीन दिवसांपासून पावसाने धुमशान घातले आहे. शेतात काम आटोपून घराकडे निघालेल्या मजुराच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
महाराष्ट्रात शनिवारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. हिंगोली जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतातील कामाला वेग आला आहे.
पुयना परिसरात सकाळपासून शेतात काम करणारे मजूर संध्याकाळी आपल्या घराकडे निघाले होते. पण, अचानक पावसाचा जोर वाढला. त्यामुळे हे आठही जण एका झाडाखाली थांबले होते.
हेही वाचा- मोठी बातमी, पुण्यात 15 तारखेपासून लागणार लॉकडाउन? पण प्रशासनाने केला खुलासा
पाऊस थांबण्याची सर्वजण वाट पाहत होते, पण काही कळायच्या आत अचानक एक वीज झाडावर कोसळली. यात 24 वर्षीय सचिन उत्तम लांडगे या तरुणाच्या अंगावरच वीज पडली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घडलेल्या प्रकारामुळे इतर मजूर भयभीत झाले होते.
सचिन लांडगेच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जातआहे. या तरुणाचा मृतदेह कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
बीडमध्ये वीज पडून बहिण- भावाचा मृत्यू
दरम्यान, वीज पडून सख्या बहिण भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील मोरवड येथे घडली होती. बीड जिल्ह्यातील मोरवड या गावात राहणारे विष्णू अशोक अंडील(17), पूजा अशोक अंडील(15) हे दोघे भाऊ- बहिण आपल्या आई-वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेले होते.
हेही वाचा-मुंबईची लाईफलाईन पुन्हा धावणार? लोकल सुरू करण्याबात मोठा निर्णय होणार
शेतात कापूस लावण्यासाठी काम सुरू होते. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता गावात पावसाला सुरुवात झाली. पावसात भिजू नये म्हणून बहिण आणि भाऊ एका झाडाखाली थांबले होते. काही कळायच्या आत वीज झाडावर कोसळला. यात बहिण-भावाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.