चंद्रकांत बनकर, (प्रतिनिधी)
रत्नागिरी, 6 जुलै- मुंबईसह संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील जगबुडी आणि चिपळूणमधील वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिणामी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक थोड्याच वेळात बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शहरातील काही भागात पाणी शिरले आहे. जगबुडी नदी लागत असणाऱ्या मटण-मच्छी मार्केटचा संपर्क तुटला आहे. मार्केट लगतची सहा ते सात दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. नदीलगतचा रास्ता देखील पाण्याखाली गेला आहे. दुसरीकडे नारंगी नदीने रौद्र रूप धारण केले आहे. खेड ते सुसेरी मार्ग पाण्याखाली गेला आहे. चिंचघर, सुसेरी, खारी परिसरातील हजारो हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. कोणाही नदीकाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालशेतमधील पूल पाण्याखाली..10-12 गावांचा संपर्क तुटला
मुसळधार पावसामुळे गुहागरमधील पालशेत बाजारपेठेत नदीचे पाणी घुसले आहे. पालशेतमधील पूल पाण्याखाली गेल्याने 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला आहे. गुहागर-चिपळूण मार्गावर पाटपन्हाळे येथे वडाचे झाड रस्त्यात पडल्यामुळे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
मार्ग बंद पडल्यामुळे वस्तीला जाणाऱ्या गाड्या आज रखडण्याची शक्यता नाकारता येत नाही. चिपळूणमध्ये पावसाचा जोर कायम असून कोंढे परिसरात पाणी घुसले आहे. मिरजोळी, शिरळ, कोंढे भागातील शेती पाण्याखाली गेली आहे.
नारगोळी नदीचे पाणी रस्त्यावर.. 30 गावांचा संपर्क तुटला
दापोलीत नारगोळी नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने जवळपास 30 गावांचा संपर्क तुटला आहे. याचा सर्वाधिक फटका आपटी येथील होमिओपॅथिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आपटी पंचक्रोशीतील लोकांना रात्री आपत्कालीन सेवेपासून वंचित राहावे लागत आहे.
पाहा VIDEO : काही सेकंदांमध्येच पत्त्यांप्रमाणे कोसळला पूल, अन्....