मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /विधानसभा अध्यक्षपदाचा पेच सुटेना, मुख्यमंत्री राज्यपालांना तिसऱ्यांदा पत्र पाठवणार

विधानसभा अध्यक्षपदाचा पेच सुटेना, मुख्यमंत्री राज्यपालांना तिसऱ्यांदा पत्र पाठवणार

 'हनुमान चालीसा तुमच्या घरात नीट म्हणण्याची संस्कृती नसेल किंवा पद्धत नसेल तर या आमच्या घरी या बोलायची असेल तर जरूर बोला

'हनुमान चालीसा तुमच्या घरात नीट म्हणण्याची संस्कृती नसेल किंवा पद्धत नसेल तर या आमच्या घरी या बोलायची असेल तर जरूर बोला

राज्यपालांकडून आज दिवसभरात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर या अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होऊ शकणार नाही.

मुंबई, 27 डिसेंबर : विधानसभा अध्यक्षपदाचा पेच काही केल्या सुटताना दिसत नाहीय. एकीकडे काँग्रेसच्या गोटात अध्यक्षपदावरुन कमालीची रस्सीखेच बघायला मिळत होती. आता दुसरीकडे अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील लेटरवॉर काही केल्या संपताना दिसत नाहीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दोन पत्र पाठवत याबाबत शिफारस केली आहे. पण या दोन्हीवेळा राज्यपालांनी वेगवेगळे कारणे दिली आहेत. दुसऱ्या पत्राला उत्तर देताना राज्यपालांनी नियमात बदल केल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री राज्यपालांना तिसरं पत्र पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री तिसऱ्या पत्रात सर्व कायदेशीर बाबींचा उल्लेख करत अध्यक्षपदाच्या निवडणुकीस मान्यता देण्याची शिफारस करणार आहेत.

विधानसभा अध्यक्षपद गेल्या वर्षभरापासून रिक्त झालेलं आहे. महाराष्ट्र विधीमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारकडून या हिवाळी अधिवेशनादरम्यान 28 डिसेंबरला अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. त्यासाठी आज अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी अर्ज करावा लागणार आहे. पण अध्यक्षपदाच्या या निवडणुकीच्या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची परवानगी गरजेची आहे. पण या निवडणुकीच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यावरुनच आता पुन्हा राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात संघर्ष बघायला मिळतोय.

हेही वाचा : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सत्ताधारी-विरोधक एकवटले, विधानसभेत ठराव मंजूर

राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला अनुमती द्यावी यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या तीन ज्येष्ठ मंत्र्यांचं शिष्टमंडळ रविवारी (26 डिसेंबर) राजभवन येथे गेलं होतं. या शिष्टमंडळाने राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या शिफारसीवर स्वाक्षरी करण्याची विनंती केली होती. याबाबत त्यांनी निवेदनपत्रही राज्यपालांना दिलं. राज्यपालांनी अभ्यास करुन निर्णय घेऊ, असं सांगितलं. त्यानंतर आज सकाळी राज्यपालांनी मुख्यमंत्री कार्यालयाला एक पत्र पाठवलं होतं. त्या पत्रात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील कायदेशीर बाबी जाणून घेऊन, चर्चा करुन मग अहवाल सादर करु, असं उत्तर त्यांनी दिलं.

हेही वाचा : विधानसभा अध्यक्ष निवडणूक: राज्यपालांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; पत्रात नमूद केलं की...

त्यानंतर महाविकास आघाडीकडून दुसरं पत्र पाठविण्यात आलं. आज दिवसभरात उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहे. त्यामुळे तात्काळ तुमचं उत्तर देण्यात यावं, अशी विनंती करण्यात आली होती. त्यानंतर राज्यपालांकडून एक पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला आलं. त्या पत्रात कायदेशीर बाबींवर शंका उपस्थित करण्यात आली आहे. त्या पत्राला उत्तर आता मुख्यमंत्री पत्राद्वारे देणार आहेत. त्या पत्रात राज्यपालांच्या सर्व कायदेशीबाबींच्या शंकाचं निरसन करण्यासाठी मुद्देसुद माहिती देण्यात येणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्यपालांकडून आज दिवसभरात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर या अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होऊ शकणार नाही. या अधिवेशनानंतर मार्च महिन्यात बजेटचं अधिवेशन असेल. त्या अधिवेशनात कदाचित निवडणूक घेतली जाऊ शकते. पण राज्यपालांनी आज संध्याकाळपर्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला तर कदाचित ही निवडणूक उद्या होऊ शकते.

First published: