04 जानेवारी, प्रवीण मुधोळकर : नव्या वर्षात संपूर्ण विदर्भ जलसंकटाच्या उंबरठ्यावर आहे. नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यात ३५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे, तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या अवघा ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यातच विदर्भ जलसंकटाच्या उंबरठ्यावर आ वासून उभा आहे.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरला पेंच धरणाचा मोठा आधार आहे. पण मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे यंदा पेंच धरणात पुरेसे पाणीच भरलं नाही. त्यामुळे नागपुरात पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्यावरही काही प्रमाणात निर्बंध यायला लागले आहेत. नागपुरात शहरात ३० टक्के पाण्याची नासाडी होत असल्याचे खुद्द पालकमंत्र्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पाणी साठ्याची स्थिती चिंताजनक आहे.
विभाग धरणे सध्याचा पाणीसाठा मागील वर्षीचा पाणीसाठा
नागपूर : सध्याचा पाणीसाठा ३८५ ३०.२५ टक्के मागील वर्षाचा पाठीसाठा ४३.७० टक्के.
अमरावती : सध्याचा पाणीसाठा ४४३ ३३.६७ टक्के मागील वर्षाचा पाठीसाठा ६१.७९ टक्के
नागपूर विभागातील धरणांमध्ये सध्या किती आहे पाणीसाठा ?
नागपूर कामठी खैरी : सध्याचा पाणीसाठा ३७.६४ टक्के मागील वर्षाचा पाठीसाठा ४३.५० टक्के
नागपूर तोतलाडोह : सध्याचा पाणीसाठा २१.६२ टक्के मागील वर्षाचा पाठीसाठा ३८.४३ टक्के
नागपूर खिंडसी : सध्याचा पाणीसाठा २० टक्के
भंडारा गोसीखुर्द : सध्याचा पाणीसाठा २०.३८ टक्के
गोंदिया इटियाडोह : सध्याचा पाणीसाठा ३२.६४ टक्के मागील वर्षाचा पाठीसाठा ८८.३९ टक्के
राज्यातील धरणांमध्ये ६४ टक्केपाणीसाठा शिल्लक आहे, तर विदर्भात अवघा ३२-३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. राज्याच्या तुलनेत सध्या विदर्भातील धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यातच विदर्भातील बऱ्याच भागात पाणीटंचाईची झळ पोहोचायला लागली आहे. जे पाणी शिल्लक आहे, ते पिण्यासाठी पुरेसे आहे, असे सिंचन विभागाचे अधिकारी सांगतात. पण आणीबाणीप्रमाणे काटकसर करुण पाणी वापरण्याचा सावधगिरीचा सल्लाही सिंचन विभाग देत आहे. येत्या सहा महिन्यात पाऊस पडेपर्यंत येणाऱ्या जलसंकटाची ही चाहूल म्हणायला हरकत नाही.