प्रशांत बाग, नाशिक, 15 ऑगस्ट : नाशिकच्या शिवारात या माय-लेकराच्या भेटीने सगळ्यांना हेलावून सोडलंय. निफाड तालुक्यातील गाजरवाडीची ही घटना आहे. प्रतापराव पुंड यांच्या शेतातील विहिरीत गेल्या 5 दिवसांपासून पडलेल्या बिबट्याच्या अवघ्या 5 महिन्यांच्या पिलाला बाहेर काढण्यात यश मिळालं आणि त्याच्या शोधासाठी चकरा मारणाऱ्या बिबट्या मादीची भेट अखेर आपल्या या बछड्याशी झाली. आई कोणतीही असो मानवाची का प्राण्याची, आई ही अखेर आईच असते,याचा प्रत्यय या घटनेनं आला.
शेतात आलेलं 5 महिन्यांचं बिबट्याचं पिल्लू विहिरीत पडलं होतं. त्याच्या शोधात येणाऱ्या बिबट्या मादीच्या डरकळ्यांनी नागरीक भयभीत होते. मात्र, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून या पिलाला 5 दिवसांपूर्वी विहिरीतून बाहेर काढले. बिबट्याचं पिलू लहान असल्यानं, पिलास मादीच्या ताब्यात देण्यासाठी वनविभागाचे रोज प्रयत्न सुरू होते. बिबट्या मादी रोज घटनास्थळी येऊन जात होती परंतु पिलास नेतही नव्हती. पिलू मोठं असल्यानं त्याला तसंच सोडणही धोक्याचं होतं.
अखेर एक शक्कल वनविभागानं लढवली. आयपी कॅमेरा सीसीटीव्ही यंत्रणा विकत घेतली आणी पिलाला एका मोठ्या पिंजऱ्यासारख्या टोपलीत ठेवलं. वनविभागानं योग्य नियोजन केल्यानं बिबट्याच्या या पिलाची सुटका करण्यासाठी बिबट्या मादी आली आणि माय लेकराची भेट झाली. हा सर्व थरार कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. आपल्या पिलाला घेऊन मादीनं खोल जंगलात धाव घेतली आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला खरा. मात्र चर्चा होती ती या माय-लेकराच्या भेटीचीच.