Home /News /maharashtra /

भाजप पक्ष सोडतोय, घोषणा करताना एकनाथ खडसे झाले भावुक!

भाजप पक्ष सोडतोय, घोषणा करताना एकनाथ खडसे झाले भावुक!

'भारतीय जनता पक्षाचे 40 वर्षांपासून काम पाहत आलो. जेव्हा भाजप खेड्यापाड्यात पोहोचली नव्हती. तेव्हापासून काम करत आलो'

    मुक्ताईनगर, 21 ऑक्टोबर : गेल्या 40 वर्षांपासून भाजपमध्ये काम करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजप पक्षातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे. पक्षात बाहेर पडत असल्याची घोषणा करताना एकनाथ खडसे यांचा गळा भरून आला होता. फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्यामुळे बाहेर पडत असल्याचे खडसेंनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर आज एकनाथ खडसे यांनी या चर्चेला पूर्णविराम देत राष्ट्रवादीत जाण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. 'माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. त्यांनी सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रात्रभर गोंधळ घातला होता. त्यानंतर त्यांनी फडणवीस यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, पोलीस सुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. त्यावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करून  गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते , असा धक्कादायक खुलासा खडसेंनी केला. 'खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मी फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा, नाईलाजाने तक्रार दाखल करावी लागली, असं उत्तर फडणवीस यांनी दिले. ते तपास करून तक्रार दाखल करा, असं सांगू शकत होते. पण, अत्यंत खालच्या स्ताराचे राजकारण करण्यात आले, अशी टीकाही खडसेंनी केली. 'भारतीय जनता पक्षाचे 40 वर्षांपासून काम पाहत आलो. जेव्हा भाजप खेड्यापाड्यात पोहोचली नव्हती. तेव्हापासून गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासह अनेक नेत्यांसोबत काम करत आलो. आतापर्यंत पक्षात काम करत असताना मला अनेक पदं मिळाली हे मी नाकारत नाही. मी कुठल्याही नेत्यावर टीका केली नाही.  मी जेव्हा मुख्यमंत्रिपदाचा दावा केला होता, त्यानंतर माझ्यावर अनेक आरोप झाले. अनेक वेळा चौकशी झाल्या' असं खडसे यांनी सांगितले. इतक्या दिवसांपासून खूप अत्याचार सहन केले. माझ्या चौकशीची मागणी कुणीही केली नाही. विधिमंडळातील रेकॉर्ड काढावे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कोणताही पक्षा असेल त्यांनी राजीनामा आणि चौकशीची मागणी केली नव्हती. पण भाजपने माझ्या राजीनाम्याची मागणी केली आणि राजीनामा घेतला. त्यानंतर मी चारवर्ष काढले. पण, मला काही मिळाले नाही. माझ्या कथित पीएवर नऊ महिने पाळत ठेवण्यात आली होती. एखाद्या मंत्र्याच्या पीएवर अशी पाळत ठेवणे हे धक्कादायक आहे, अशी माहिती विधानसभेत सुद्धा देण्यात आली आहे, असंही खडसे म्हणाले. त्याचबरोबर शिवसेना आणि भाजप युती तोडण्याची माझी भूमिका नव्हती. युती तोडण्याचा निर्णय हा सर्वांनी मिळून घेतला होता. विरोधी पक्ष नेता असल्यामुळे मला फक्त घोषणा करावी लागली होती, असंही खडसेंनी सांगितलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या