ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी
लातूर, 21 मार्च: राज्यात होत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिके आडवी होत आहेत. लातूर जिल्ह्यात 17 व 18 मार्च रोजी झालेल्या गारपिटीने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळताच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ जिल्हा दौरा केला. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्री महाजन यांनी दिले आहेत.
पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर
लातूर जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळताच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी लातूर येथे येवून जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली. रेणापूर तालुक्यातील रामवाडी येथील पंढरी उगिले यांच्या शेतातील आंब्याच्या बागेचे गारपिटीने नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी पालकमंत्री महाजन यांनी पाहणी केली. तसेच पानगाव फाटा येथील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाईल. या नैसर्गिक संकटात शासन शेतकऱ्यांची पाठीशी असल्याची ग्वाही पालकमंत्री महाजन यांनी शेतकऱ्यांना दिली.
फळबागांचेही मोठे नुकसान
अवकाळी पाऊस, गारपिटीने जिल्ह्यात ज्वारी, हरभरा सारख्या पिकांसह आंबा, द्राक्षेसारख्या फळबागांचेही नुकसान झाले आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपीक नुकसानीचे पंचनामे तत्काळ सुरु करण्याचे आदेश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत. पंचनामे करताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री महाजन यांनी आढावा बैठकीत दिल्या.
शेतकऱ्यांची मागणी
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचमाने करताना ते अधिकाधिक वस्तुनिष्ठ व अचूक होतील.निलंगा तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाला असून द्राक्षे बागा, ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचमाने तातडीने सुरु करावेत, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
सांगली जिल्ह्यातील 'या' भागात चक्क हवेवर पिकवला जातो गहू! पाहा काय आहे प्रकार, Video
अवकाळीने या तालुक्यात झाले नुकसान
जिल्ह्यात 17 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसाने देवणी तालुक्यात सुमारे एक हजार 67 हेक्टर, अहमदपूर तालुक्यात सुमारे आठ हेक्टर आणि जळकोट तालुक्यात सव्वाचार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच 18 मार्च रोजी झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने जिल्ह्यातील इतरही तालुक्यांमधील शेतपिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांचा संप सुरु असला तरी शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कर्मचारी सहकार्य करणार आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Girish mahajan, Latur, Local18, Rain