ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी
लातूर, 29 मार्च: गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. यंदाही काही शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग केला आहे. दापका येथील शेतकरी राजाराम देशमुख यांनी चार एकर उन्हाळी सोयाबीनची लागवड केली आहे. विशेष म्हणजे हे सोयाबीनचे पीक जोमात असून 18 क्विंटलपेक्षा जास्त उताराची शक्यता व्यक्त होत आहे.
खडकाळ जमिनीत सोयाबीन
राजाराम देशमुख यांनी खडकाळ जमिनीत उन्हाळी सोयाबीन केले आहे. तरीही सोयाबीनचे पीक जोमात आले आहे. या सोयाबीनची औषध आणि पाण्याची योग्य काळजी घेतल्यामुळे ते जास्त प्रमाणात फुलले आहे. उन्हाळी सोयाबीन वरती किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत नाही. फक्त बुरशी हा प्रकार खोडामध्ये दिसून येतो. या सोयाबीनचे उत्पादन घेताना बुरशीनाशकाचा वापर केल्यास उत्पादनात चांगला फरक दिसून येतो.
उन्हाळी सोयाबीनची गुणवत्ता चांगली
खरीप हंगामपेक्षा उन्हाळ्यात घेण्यात येणाऱ्या सोयाबीनची गुणवत्ता ही अतिशय उत्कृष्ट असते. तसेच खरीप हंगामात पेरणीसाठी चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध होते. त्यासाठी हा प्रयोग करण्यात आलेला आहे. एरवीपेक्षा याला रोगराई नसते आणि त्यामुळे अतिशय उत्कृष्ट सोयबीनचे बियाण उपलब्ध होते. याचा उतारा कमी आहे परंतु बियाण्याची गुणवत्ता अधिक आहे आणि केवळ बियाण्यासाठी म्हणून यावर्षी हे सोयाबीन लावलेले आहे, असे शेतकरी देशमुख यांनी सांगितले.
मागील वर्षी 17 क्विंटल उतार
मागील वर्षी उन्हाळी सोयाबीनला एकरी 17 क्विंटल एवढा उतार मिळाला होता. यावर्षी 18 क्विंटल पेक्षा जास्त उतार मिळेल, अशी अपेक्षा राजाराम देशमुख यांनी व्यक्त केली. उन्हाळी सोयाबीन वरती किडीचा प्रादुर्भाव कमी असून यामध्ये फक्त बुरशीनाशक औषधाचा वापर व दिवसातून एक वेळा तुषार सिंचनाद्वारे पाणी देणे आवश्यक आहे.
Success Story : सिताफळाचे भाव पडले म्हणून शेतकऱ्यानं शोधला नवा उद्योग,आता करतोय लाखोंची कमाई, Video
हा प्रयोग शेतकऱ्यांना दिशादायी ठरेल
लातूरचे कृषी सहसंचालक रावसाहेब दिवेकर यांनी हा सोयाबीनची शेतीची पाहणी केली. अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग जिल्ह्यात केला आहे. देशमुख यांच्या शेतात एका झाडाला 80 ते 100 शेंगा असून हा सोयाबीनचा प्रयोग शेतकऱ्यांना मार्गदर्शक आहे, असे मत दिवेगावकर यांनी व्यक्त केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Latur, Local18