मराठा आरक्षणासाठी लातूराच्या शिक्षकाने केली आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी लातूराच्या शिक्षकाने केली आत्महत्या

  • Share this:

लातूर, 8 ऑगस्ट : तालुक्यातील माटेफळ येथील शिक्षकाने आज (बुधवारी) गळफास घेऊन आत्महत्या केली. रमेश पाटील असे त्यांचे नाव आहे. मुलांचे शिक्षण झालेले असतांनाही, त्यांना आरक्षण नसल्यामुळे नोकरी लागत नाही म्हणून रमेश पाटील यांनी आत्महत्येचा मार्ग पत्कारला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली, ज्यात त्यांनी आत्महत्येच्या कारणासोबतच शासनाने त्यांच्या पत्नीला पेंशन सुरू करावी अशी मागणी केली आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतांना, ते मिळावे म्हणून आत्महत्या सत्र सुरूच आहे. शिक्षणासह नोकऱ्यांमध्येसुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजातील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. अहमदनगर जिल्ह्यात जलसमाधी आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरूणाने गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. या आंदोलनातील ती पहिली आत्महत्या ठरली. त्यानंतर राज्यात आत्महत्यांचं सत्र सुरू झालं. याच कारणासाठी लातूरचे शिक्षक रमेश पाटील यांनी आज जगाचा निरोप घेतला. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यांची मुलगी एमएससीला विद्यापीठातून दुसरी आणि जिल्ह्यातून पहिली आली. तिन्ही मुलांचे शिक्षण उत्तम झाले असले तरी, आरक्षण नसल्यामुळे त्यांना नोकरी लागत नाहीय. मुलांना शिकविल्यानंतरसुद्धा ते घरीच बसून असल्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे रमेश पाटील यांनी चिठ्ठीत लिहीलंय.

आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी तुम्हीच विचार करा शिक्षण म्हणजे काय? असा सवाल शासनाला केला आहे. मी माझ्या पगारावर संसाराचा गाडा येथवर ओढला, त्यात आता कर्जही झालंय. माझ्यानंतर माझ्या पत्नीला लवकरात लवकर निवृत्तीवेतन सुरू करावे असेही त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवलंय. रमेश पाटील यांच्या जाण्यामुळे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या यादीमध्ये आणखी एक भर पडली आहे.

मराठा आरक्षणासाठी तिने विषप्राशन करून संपविली जीवनयात्रा

मराठा आरक्षणासाठी तृष्णा तानाजी माने (वय १९) या तरुणीने 2 ऑगस्ट रोजी विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देवळाली गावात घडली. ती बी-कॉमच्या द्वितीय वर्षाला होती. यापुर्वी झालेल्या मराठा मूक मोर्चामध्ये ती सहभागी झाली होती.

फेसबुकवर मुख्यमंत्र्यांच्या नावाने पोस्ट टाकून त्याने स्वतःला जाळून घेतले

परभणीच्या एका युवकाने मराठा आरक्षणासाठी फेसबुकवर मुख्यमंत्र्यांच्या नावाने पोस्ट टाकून स्वतःला जाळून घेतले. 5 ऑगस्ट रोजी सेलु तालुक्यातील डीग्रस वाडी गावात ही घटना घडली. अंनत लेवडे असे या युवकाचे नाव आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे ही इच्छा असल्यानं मी स्वतः बलीदान देत असल्याचे त्याने मुख्यमंत्र्यांना टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

 

First published: August 8, 2018, 5:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading