लातूरमध्ये सत्तेचा 'कर्नाटक पॅटर्न', काँग्रेसने भाजपला दाखवले आस्मान!

लातूरमध्ये सत्तेचा 'कर्नाटक पॅटर्न', काँग्रेसने भाजपला दाखवले आस्मान!

राज्यात एकाबाजुला महाविकासआघाडी अस्तित्वात येत असताना तिकडे लातूरात काँग्रेसनं सत्तेचा कर्नाटक पॅटर्न राबवत बहुमत नसतानाही सत्ता खेचून आणली.

  • Share this:

नितीन बनसोडे,प्रतिनिधी

लातूर, 22 नोव्हेंबर : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मोठी मुसंडी मारत महापालिका खेचून घेणाऱ्या भाजपला काँग्रेसनं लातुरात धोबीपछाड दिला. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसनं बहुमत नसतानाही बाजी मारत भाजपच्या हातून सत्ता हिसकावून घेतली.

राज्यात एकाबाजुला महाविकासआघाडी अस्तित्वात येत असताना तिकडे लातूरात काँग्रेसनं सत्तेचा कर्नाटक पॅटर्न राबवत बहुमत नसतानाही सत्ता खेचून आणली. अडीच वर्षांपूर्वी काँग्रेसच्या गडाला खिंडार पाडून भाजप लातूर महापालिकेत सत्तेत आली. पण बहुमत असूनही अंतर्गत गटबाजीनं भाजपला सत्तेवर पाणी सोडावं लागलंय.

पक्षीय बलाबल

एकूण नगरसेवक - 68

भाजप - 35

काँग्रेस - 33

राष्ट्रवादी - 01

काँग्रेसकडे बहुमत नव्हतं. पण, भाजपच्या दोन नगरसेवकांनी ऐनवेळी बंडखोरी करत काँग्रेसचे उमेदवार विक्रांत गोजमगुंडेंना पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेसच्या विक्रांत गोजमगुंडेंनी 35 मतं मिळवत अत्यंत नाट्यमयरित्या भाजपच्या शैलेश गोजमगुंडेंचा पराभव केला आणि महापौरपदाची खुर्ची पटकावली. तर भाजपचे बंडखोर नगरसेवक चंद्रकांत बिराजदारांना उपमहापौर करून काँग्रेसनं मदतीची परतफेड केली.

भाजपनं काँग्रेसच्या नेत्यांवर घोडेबाजाराचा आरोप करत जनादेशाचा अपमान केल्याचा ठपका ठेवला. शिवाय पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी शायरीतून पक्षातल्या गटबाजीबद्दलची खंत व्यक्त केली.

लातूर भाजपमध्ये निर्माण झालेल्या गटबाजीनं विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पक्षाला मोठा फटका बसला. गटबाजीचं हे ग्रहण कायम राहिल्यानं मोठ्या प्रयत्नानं हातात आलेली महापालिकेची सत्ता भाजपला गमवावी लागली. त्यामुळे काँग्रेसला हातातून निसटलेला बालेकिल्ला पुन्हा सर करणं शक्य झालंय.

=====================

First published: November 22, 2019, 11:09 PM IST

ताज्या बातम्या