मुंबई, ता. 30 मे : अंदमानात दाखल झालेला मोसमी पाऊस काल केरळमध्ये दाखल झाला असून ६ ते १० जून दरम्यान पाऊस राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी पावसाने ३० मे रोजी केरळमध्ये प्रवेश केला होता. यावर्षी पावसाने एक दिवस अगोदरच केरळमध्ये प्रवेश केला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं महाराष्ट्रात मान्सून पुढं सरकण्यास अनुकूल वातावरण तयार झाल्याचं हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी सांगितलंय. 7 जूनच्या आधी मान्सून मुंबईत दाखल होईल अशी अपेक्षा आहे.
केरळमध्ये पाऊस दाखल झाल्यानं आता शेतीच्या कामांना वेग आलाय. पाऊस वेळेवर सुरु झाल्यानं तो समाधानकारक पाऊस होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केलीये. दरम्यान, पावसाळ्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी सर्वच यंत्रणांची तयारी झाली आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
गेल्या वर्षीच्या अडचणी लक्षात घेत, या वर्षी नियोजन करण्यात आलंय. पावसाळ्यात सर्व यंत्रणांनी एकमेकांशी अधिक समन्वय ठेवत अडचणींवर मात करावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. सह्याद्री अतिथीगृहात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक झाली.
या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षी आलेल्या अडचणी यंदा उद्भवणार नाहीत, यासाठी यंदा योग्य नियोजन झालंय. मुंबईत गेल्या वर्षी पाणी साचण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या. या घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाल्या आहेत. त्यामुळे, या वर्षी अशा ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाईल असंही मुख्यमंत्री म्हणालेत. पण ऐन पावसाच्या वेळी याची कशी अंमलबजावणी होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.