बुलडाणा, 16 फेब्रुवारी : आपली माणसं, घर सोडून सीमेवर डोळ्यात तेल घालून देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांची आणि कुटुंबियांची भेट अनेक महिने होत नाही. सीमेवर असतानाही त्यांच्या मनात कुटुंबाची काळजी असते. वेळ मिळाला की घरच्यांना फोन करुन त्यांची विचारपूस करतात. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नितीन राठोड यांनीही हल्ल्यापूर्वी काही तास अगोदर घरी फोन केला होता. सर्वांच्या तब्येतीची विचारपूसही केली होती. त्यानंतर काहीच तासांनी त्यांना वीरमरण आले.
बुलडाण्यातील असलेले नितीन राठोड आठवड्यापूर्वी सुट्टी संपवून १२ फेब्रुवारीला नागपूरहून गेले होते. त्यांची नियुक्ती जम्मू काश्मीरमध्ये झाली होती. पुलवामात हल्ला झाला त्याअगोदर काही तास त्यांनी पत्नीला फोन केला होता. मुलगा पीयुषच्या तब्येतीची चौकशी यावेळी त्यांनी केली होती.
काश्मीरमध्ये पोहचल्यावर नितीन तिथल्या निसर्गाचे अनेक फोटो मुलांना फोनवर पाठवले होते. हल्ला होण्यापूर्वी काही तास आधीही त्यांनी काढलेला सेल्फी पाठवला होता. हा त्यांचा शेवटचाच सेल्फी ठरला आणि त्यानंतर नितीन राठोड यांना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात वीरमरण आले.
पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा इथं सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. शहीदांमध्ये महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांचा समावेश आहे. शहीद राठोड यांच्यावर लोणार येथे अंत्यसंस्कार होणार आहेत तर संजय राजपूत यांच्यावर मलकापूरमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.
VIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहिदांबद्दल सांगताना News18India च्या अँकरला अश्रू अनावर