कोरेगाव भीमा हिंसाचार : मिलिंद एकबोटेसह अन्य आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक आदेश

कोरेगाव भीमा हिंसाचार : मिलिंद एकबोटेसह अन्य आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक आदेश

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपींना यंदा 1 जानेवारीला विजयस्तंभ परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली

  • Share this:

अद्वैत मेहता, प्रतिनिधी

पुणे, 28 डिसेंबर : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपींना यंदा 1 जानेवारीला विजयस्तंभ परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी याबाबत तसे आदेश काढले आहे.

पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज शुक्रवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी, "या प्रकरणातील जे जे आरोपी आहेत. त्यांना प्रतिबंधात्मक आदेश बजाण्यात आले आहेत." असं सांगितलं आहे.

पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश बजावल्यामुळे या प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे तिथे जाऊ शकणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे.

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत पुण्यात आढावा बैठक घेण्यात आली. तेव्हा, रिपाइं युवामोर्चातर्फे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना गावबंदी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

विजयस्तंभापासून 200 मीटर अंतरावर सभा

1 जानेवारीला कोरेगाव भीमा विजयस्तंभापासून 200 मीटर लांब मोकळ्या मैदानात सभा घ्यायला परवानगी पोलिसांकडून देण्यात आली आहे. या ठिकाणी रिपाइंचे नेते रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर , भाई विवेक चव्हाण, भारत मुक्ती मोर्चा यांच्या सभा होतील, अशी माहितीही संदीप पाटील यांनी दिली.

तर पुण्यात 30 जानेवारीला भीम आर्मी प्रमुख रावण उर्फ चंद्रशेखर आझाद यांची सभा होणार आहे. "हे वृत्तपत्रात वाचलं अद्याप परवानगीसाठी अर्ज आला नाही, आल्यावर पाहू. मात्र, जर कुणी आक्षेपार्ह भाषण करेल असं वाटलं तर

परवानगी दिली जाणार नाही", अशी स्पष्टोक्ती पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली.

भीमा कोरेगावात कडेकोट बंदोबस्त

गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा आणि परिसरात 29 डिसेंबरपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरेगाव भीमा, विजयस्तंभ परिसरासह लोणीकंद, पेरणे, वढू बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापूर परिसरात एक जानेवारीला इंटरनेट सेवेवर प्रतिबंध राहणार आहे.

दरम्यान, वाहतुकीसह सर्व सेवांच्या नियोजनाचा आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. विजयस्तंभ परिसरात मोबाईल इंटरनेट सेवेवर प्रतिबंध असला तरी पोलिसांच्या संदेशवहनासाठी बंदोबस्तावरील अधिकाऱ्यांकडे अत्याधुनिक वायरलेस यंत्रणा असणार आहेत.

========================

First Published: Dec 28, 2018 04:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading