पुणे, 01 जानेवारी : विजयस्तंभ अभिवानदन सोहळ्यासाठी कोरेगाव भीमा येथे भीमसागर उसळला आहे. नववर्षाचं स्वागत करत 'जय भीम'चा नारा देत हजारो अनुयायींनी विजयस्तंभाला मानवंदना दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी भीमा कोरेगाव येथे जाऊन विजयस्तंभाला मानवंदना दिली. नववर्षात सरकार महिलांची सुरक्षितता, रोजगार आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशिल असेल, असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. मंत्री नितिन राऊत आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील भीमा कोरेगाव येथे पोहोचणार आहेत. हा सोहळा शांततेत पार पडावा यासाठी पोलीस आणि प्रशासनाने कडेकोट नियोजन केलं आहे. सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. लोणीकंद शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरवर्षी होणाऱ्या या सोहळ्यामध्ये 2018 सारखा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. 740 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर आहे. सोशल मीडियावरून जातीय भावना दुखावणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. यासाठी 250 हून अधिक व्हॉटसअॅप ग्रुपच्या अॅडमिनला याआधीच नोटिस बजावण्यात आली आहे.
कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ अभिवादनासाठी होणाऱी गर्दी लक्षात घेऊन परिसरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये कोरेगाव भीमा, सणसवाडी इथल्या शाळा आणि महाविद्यालयांचा समावेश आहे. मात्र, या भागातील कंपन्या सुरूच राहणार आहेत. त्या बंद ठेवण्याबाबत कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी सांगितले.
2018मध्ये नक्की काय झालं होत
पुण्यापासून सुमारे 40 किमी अंतरावर असलेल्या भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दलित नेत्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता, ज्याला काही संघटनांनी काही कारणांनी विरोध दर्शविला. त्यानंतर याठिकाणी हिंसाचार भडकला. या घटनांची सुरुवात पुण्याजवळच्या कोरेगाव भीमा, पाबळ आणि शिक्रापूर येथून झाली. या गावांमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. राज्यभरात दुसऱ्या दिवशी याचे पडसाद उमटले. तर, प्रकाश आंबेडकर यांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती आणि घटनेनंतर झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते.
वाचा : दलित समाजासाठी भीमा कोरेगाव का आहे अस्मितेचं प्रतिक? असा 'विजय दिना'चा इतिहास
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.