चिपळूण, 25 जुलै: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज पूरग्रस्तं चिपळूण (Flood-hit Chiplun) मधील बाजारपेठ, चिंचखरी नाका आणि अभिरुची हॉटेल येथे येऊन व्यापारी, स्थानिक नागरिक आणि छोटे छोटे व्यवसायिकांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हाधिकारी आणि आपतकालीन विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करून महापूराच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत देण्याचं जाहीर केलं आहे.
NDRFच्या धर्तीवर प्रत्येक जिल्हयात एक टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वांची आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. हवामान बदलाचा फटका बसला आहे. आपण वस्तूस्थिती स्वीकारली पाहिजे. संकटांचा धोका लक्षात घेता एनडीआरएफच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात एक टीम तयार केली जाणार आहे. कोकणात पूर व्यवस्थापन उभारणार आहोत. वारंवार संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन या सर्व सबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल. राज्य आपत्ती निवारण दले म्हणजेच एसडीआरएफ आहेच पण ते अधिक सक्षम करु अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली.
रायगडमधील दरड कोसळतानाचा LIVE VIDEO
उद्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार
कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात सुद्धा अतिवृष्टीने पूरस्थितीत निर्माण झाली आहे. या ठिकाणी सुद्धा मुख्यमंत्री पाहणी दौरा करणार आहेत. उद्या म्हणजेच 26 जुलै रोजी मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
तातडीने मदत देणार
पूरग्रस्तांपैकी कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, संपूर्ण आढावा घेऊन योग्य ती मदत करण्यात येईल. आर्थिक मदतीसह इतरही सर्व मदत करणार आहोत. आता पूरग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत.
तळीये गावातील दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून मिळणार घरं, नारायण राणेंची घोषणा
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
चिपळूणच्या पूरग्रस्त भागाची मी आज पाहणी केली आहे, नागरिकांशी प्रत्यक्ष भेटून बोललो आहे.
काल मी रायगड जिल्ह्यातल्या तळीये गावामध्ये देखील जाऊन आलो, आपत्तीची अंगावर काटा येईल अशी दृश्ये आहेत .
उद्या मी पश्चिम महाराष्ट्राचाही आढावा घेत आहे, तेथे देखील पुराचे मोठे संकट आहे
केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतरच नुकसानभरपाई संदर्भामध्ये जाहीर करण्यात येईल, तसेच केंद्राकडून देखील काय आणि किती मदत मागायची ते ठरवता येईल
मदत करताना तांत्रिक मुद्द्यांवर अडचणी येऊ नयेत या संदर्भातील सूचना देखील मी प्रशासनाला केल्या आहेत
केंद्र सरकारकडून आपल्याला व्यवस्थित मदत मिळत आहे माझे पंतप्रधान, गृहमंत्री,संरक्षण मंत्री यांच्याशी बोलणं झाले आहे. एनडीआरएफ, लष्कर, हवाई दल यांच्या तुकड्या राज्य सरकारला पूर परिस्थितीत मदत करताहेत.
येथील नागरिकांना पाऊस,पूर, पाणी नवीन नाही परंतु या वेळेला जे झालं ते अकल्पित होतं आणि पाणी झपाट्याने वाढल्यामुळे त्यांना आपले सामान आणि वस्तूदेखील वाचवता आल्या नाहीत.
यापुढे अशा घटना घडू नये म्हणून पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार आहोत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chiplun, Konkan, Maharashtra, Mumbai, Rain flood, Uddhav thackeray