सोलापूर, 01 फेब्रुवारी : कोल्हाट्याचं पोर या कादंबरीचे लेखक दिवंगत डॉक्टर किशोर शांताबाई काळे यांच्या आईची घरासाठीची वणवण अजूनही थांबलेली नाही. सरकार दरबारी अनेक अर्ज केल्यानंतरही अद्याप घर मिळालं नसल्याची खंत शांताबाई काळे यांनी व्यक्त केलीय. लावणी कला गेल्या ४० वर्षांपासून जोपासणाऱ्या शांताबाई सध्या हालाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. त्यांना आज घडीला निवृत्त कलावंत म्हणून दीड हजार रुपये इतकं तुटपुंज्या मानधनावर आणि डॉक्टर किशोर काळे यांच्या पुस्तकाची रॉयल्टी यावरच उदरनिर्वाह करावा लागतोय.
घराच्या बांधकामासंदर्भात शांताबाई यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचीसुद्धा भेट घेतली होती. त्यासंदर्भात अर्ज देऊन पाठपुरावाही केला. दरम्यान, मुंबईत मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडेही लेखी निवेदन दिलं होतं. नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनावेळी रहायला हक्काचं घर आणि वेळेवर मानधन मिळावं या मागणीचा पाठपुरावाही केला. इतकंच नाही तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिनिधींकडे निवेदन दिलं होतं. शांताबाई यांना यावर कार्यवाहीचे आश्वासन मिळाले पण त्यावर प्रत्यक्षात कोणतीच कार्यवाही होऊ शकली नाही.
हेही वाचा : अॅलेस डेथ, व्हॉट आय डू? हातावर लिहून 17 वर्षीय मुलाने कॉलेजच्या शौचालयात संपवलं आयुष्य
अर्ज-विनंत्या अन् पाठपुरावा केल्यानंतरही काहीच होत नसल्यानं शांताबाई काळे यांनी खंत व्यक्त करताना म्हटलं की, माझा मुलगा जिवंत असता तर अशी भटकण्याची वेळ माझ्यावर आली नसती. ज्यांच्याकडे श्रीमंती आहे अशा लोकांना सरकार घर उपलब्ध करून देतंय. आमच्यासारख्या गरिबांकडे लक्ष द्यायला कोणी नाही.
शांताबाई काळे यांनी त्यांचा मुलगा किशोरला डॉक्टर केलं होतं. किशोर काळे यांनी कोल्हाट्याचं पोर हे आत्मचरित्र लिहिलं होतं. किशोर काळे यांचं २००७ मध्ये अपघातात निधन झालं होतं. आता शांताबाई यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, चार जिल्हाधिकारी बदलले पण न्याय मिळत नाहीय. अधिकारी मंत्र्यांचे उंबरठे झिजवून थकले. लोकांच्या प्रेमामुळे आज जगतेय. स्वाभिमानाने जगण्याची सवय असल्यानं आजपर्यंत हात पसरले नाही. हक्काच्या घरात अखेरचा श्वास घ्यायची इच्छा असल्याचंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा : 'शेतात गांजा लावू द्या', बेरोजगार अभियंत्याने केली मागणी, पत्र व्हायरल
किशोर काळे यांचं अपघाती निधन झाल्यानंतर शांताबाई काळे यांच्यावर मोठा दु:खाचा डोंगरच कोसळला. त्यानंतर दयनीय अवस्थेत त्या आयुष्य जगत आहेत. स्वत:चं घर नाही, एका पत्र्याच्या खोलीत भाड्याने राहतात. निवृत्त कलावंत म्हणून मिळणाऱ्या मानधनातून त्या भाडं देतात. पण आता भाडं द्यायचं की पोटाला अन्न घ्यायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
शांताबाई काळे यांच्या घरासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी आश्वासन दिलं होतं. त्यानतंर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश देत आवश्यक असणारी मदत करण्यासही सांगितलं होतं. तेव्हा करमाळा तालुक्यात नेरले इथं शांताबाई यांना घरासाठी जागाही उपलब्ध करून देण्यात आली होती. पण डॉक्टर राजेंद्र भारूड यांची बदली झाल्यानतंर घराचं बांधकाम होऊ शकलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.