आजरा, 28 फेब्रुवारी: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या आजरा (Ajara) तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील पेरणोलीच्या जंगलात (Pernoli Forest) एका 22 वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला आहे. संबंधित तरुण 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. बेपत्ता झाल्यानंतर चार दिवसांनी आजरा येथील पेरणोलीच्या जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत तरुणाच्या वडिलांनी या घटनेची माहिती आजारा पोलिसांना दिली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
स्वप्नील मारुती दिवटे असं मृतावस्थेत आढळलेल्या 22 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो आजरा तालुक्यातील येमेकोंड येथील रहिवासी होती. मृताचे वडील मारुती दिवटे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, मृत स्वप्नील याचा विवाह 2019 मध्ये पेरणी येथील रहिवासी असणाऱ्या संजय दळवी यांच्या मुलीशी झाला होता. लग्न झाल्यानंतर काही दिवस आनंदात गेल्यानंतर पती आणि पत्नीमध्ये अंतर्गत वाद सुरू झाला.
हेही वाचा-पिंपरीत शिक्षिकेवर पोलिसाकडून बलात्कार; गरोदर राहताच केलं अघोरी कृत्य
सततच्या वादाला कंटाळून मृत स्वप्नीलच्या पत्नीनं 23 फेब्रुवारी रोजी घटस्फोट दिला होता. घटस्फोट दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वप्नील आपल्या राहत्या घरातून गायब झाला. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला पण त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक आणि मित्रांना फोन करून स्वप्नील बाबत चौकशी केली, त्यांनाही स्वप्नीलचा ठावठिकाणा माहीत नव्हता. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी आजरा तालुक्यातील येमेकोंड परिसरातील पेरणोलीच्या जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे.
हेही वाचा-'पुण्यात शिकायचं असेल तर पैसे दे', NCP च्या युवा नेत्यानं उकळली 10 लाखांची खंडणी
जंगल परिसरात एका झाडाला नायलॉनच्या दोरीनं गळफास घेतलेल्या आणि सडलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती मिळताच आजरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची अवस्था पाहून पोलीसही हादरले. या प्रकरणी पोलिसांनी मृत स्वप्नीलच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. स्वप्नीलनं आत्महत्या केली की त्याच्यासोबत घातपात झाला? याचा तपास आजरा पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kolhapur, Suicide