मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सततच्या बदलत्या वातावरणाचा दुष्परिणाम; पुढील आठवड्यात 'या' पद्धतीनं घ्या पिकांची आणि पशुधनाची काळजी

सततच्या बदलत्या वातावरणाचा दुष्परिणाम; पुढील आठवड्यात 'या' पद्धतीनं घ्या पिकांची आणि पशुधनाची काळजी

कोल्हापूरच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे.

कोल्हापूरच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे.

कोल्हापूरच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Kolhapur, India

  साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी

  कोल्हापूर, 01 एप्रिल : बऱ्याचदा शेतकऱ्यांना कडक उन, अवकाळी पाऊस आणि बदलते वातावरण यांचे दुष्परिणाम आपल्या पिकांवर होताना पाहात बसावे लागते. पण हेच पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कोल्हापुरच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राकडून पुढील काही दिवसांबद्दलचा अंदाज वर्तवण्यात येतो. त्यामुळे शेतीतील पीक चांगल्या पद्धतीने टिकवण्यासाठी शेतीची पुरेपूर काळजी घेणे, शेतकऱ्यांसाठी सोपे होते. अशाच प्रकारे कोल्हापूर, सांगली आणि सातारा पुढच्या काही दिवसांचा हवामानाचा अंदाज सांगितलेला आहे.

  कसे असेल हवामान ?

  कोल्हापूर येथील केंद्राला प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये दिनांक 1 ते 5 एप्रिल दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे.

  कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 34° ते 37° सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात कमाल तापमान 35° ते 37° सेल्सिअस आणि सातारा जिल्ह्यामध्ये कमाल तापमान 36° ते 37° सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान अनुक्रमे 18° ते 19°, 17° ते 19° आणि 17° ते 19° सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये अनुक्रमे वाऱ्याचा वेग ताशी 11 किमी पर्यंत, 13 ते 15 किमी आणि 11 ते 12 किमी दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तर विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रामध्ये दिनांक 1 एप्रिल ते 04 एप्रिल दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीच्या दरम्यान तसेच कमाल तापमान व किमान तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

  या पिकांची घ्या काळजी

  गहू - गहू बियाणे साठवणुकीच्या काळात साँडेकिडीच्या नियंत्रणासाठी उन्हात वाळवलेल्या बियाण्यास प्रती किलो 10 ग्रॅम याप्रमाणे वेखंड भुकटीची बीज प्रक्रिया करावी.

  मका - परत मका पिकाची काढणी करावी. काढणी केलेली कणसे उन्हामध्ये वाळवावीत व नंतर मळणी करून तयार झालेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

  हरभरा - पक्व झालेल्या हरभरा पिकाची त्वरित काढणी आणि मळणी करून घ्यावी. मळणी करून तयार झालेला शेती माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

  ऊस - (शाखीय वाढीची अवस्था असलेल्या उसाला) 6 ते 8 आठवड्यांच्या सुरु उसाला नत्र खतांचा दुसरा हप्ता 40% (100 किलो नत्र म्हणजेच हेक्टरी 217 किलो युरिया) द्यावा. तर वाढीची अवस्था असलेल्या उसावरील खोड किडीच्या नियंत्रणासाठी एकरी 2 फुले ट्रायकोकार्डची 10 ते 15 दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार 2 ते 3 वेळा वापरावीत. एप्रिल महिन्यामध्ये सरासरी बाष्पीभवनाचा वेग 7.73 मिमी प्रती दिवस एवढा असतो. त्यामुळे ऊस पिकास प्रती दिवस 7.21 लिटर एवढ्या पाण्याची गरज असते. त्यामुळे ऊस पिकाची पाण्याची गरज पूर्ण होण्यासाठी ठिबक सिंचन संच (4 लिटरचा ड्रीपर) दररोज 01 तास आणि 48 मिनिटे चालू ठेवावा.

  टोमॅटो - पांढरी माशी व फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड 0.5 मि.लि. प्रती लिटर पाण्यातून फवारावे.

  कलिंगड - कलिंगडावरील फळमाशीच्या नियंत्रणासाठी 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी व क्ल्यू ल्यूर कामगंध सापळे एकरी 5 या प्रमाणात वापरावेत.

  सूर्यफूल - सूर्यफुल पिकास फुलोरा ते दाणे भरणे या संवेदनशील अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नये, यासाठी पाण्याची उपलब्धता करावी. पिक फुलोऱ्यात असताना सकाळी 7 ते 11 या वेळेत हाताला तलम कापड गुंडाळून फिरवावा म्हणजे कृत्रिम परागीभवन होऊन दाणे भरण्याचे प्रमाण वाढते. फुलाच्या तबकावरून हळुवार हात सूर्यफुलाचे फुल उमलण्याच्या अवस्थेत व त्यानंतर आठ दिवसांनी 2 ग्रॅम बोरॅक्स प्रती लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी त्यामुळे दाणे भरण्याचे प्रमाण व दाण्याचे वजन वाढले. परागीभवन होण्यासाठी प्रती हेक्टरी 4 ते 5 मधमाश्याच्या पेट्या ठेवाव्यात.

  द्राक्ष -एप्रिल महिन्यामध्ये द्राक्ष घड काढणीनंतर वेलींमधील अन्नद्रव्यांमधील साठा कमी होतो. द्राक्ष काढणीनंतरच्या खरड द्राक्ष छाटणीनंतर वेलीमध्ये अन्नद्रव्य साठ वाढीसाठी नवीन आलेली पाने हि वेलीची वाढ आणि विकासासाठी महत्वाची असतात.

  शेतकऱ्यांना 3 महिन्यात लखपती करणाऱ्या आरोग्यवर्धक बिया, पाहा काय आहे लागवडीचा मंत्र, Video

  त्यासाठी खालील उपाय योजना कराव्यात :

  वेलींवर असलेली पाने सुकू नयेत, म्हणून वेलींना गरजेपुरतेच पाणी दयावे. साधारणतः दर आठवड्यास 6000 ते 6500 लिटर पाणी प्रती एकर या प्रमाणात यावे. पाणी वाया जात असल्याने पाटाने पाणी देणे टाळावे. पाणी देताना मुळाच्या भागात राहील याची काळजी घ्यावी.

  जनावरांचे वाढणाऱ्या तापमानापासून संरक्षणासाठी पुढील उपाय करावेत

  जनावरे सावलीच्या ठिकाणी बांधावीत शक्य असल्यास दिवसातून 4 ते 5 वेळा त्याच्या अंगावर पाणी फवारावे. म्हशींना पाण्यात डुंबू द्यावे. जनावरांना पुरेशे शुद्ध व थंड पाणी पिण्यास द्यावे, जनावरांना पुरेसा प्रथिनेयुक्त व हिरवा चारा आणि खनिज मिश्रण द्यावे. दुपारच्या वेळेस जनावरे धारावयास नेऊ नयेत. गोठ्याच्या भिंती पांढऱ्या रंगाने रंगविल्यास तापमान कमी होण्यास मदत होते. गोठ्याच्या छतावर गवताचा थर द्यावा, जेणेकरून प्रखर सूर्य किरणामुळे छत तापणार नाही.

  Beed News: वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका, शेतकऱ्यांनो अशी घ्या काळजी, Video

  पोल्ट्री पक्षी - पोल्ट्रीमधील पक्षांचे वाढणाऱ्या तापमानापासून संरक्षणासाठी पोल्ट्रीच्या बाजूने बारदाणे लावावेत व त्यावर वारंवार पाणी शिंपडावे जेणेकरुन आतील तापमान कमी राहण्यास मदत होईल. तसेच पोल्ट्रीमध्ये हवा खेळती राहिल याची काळजी घ्यावी.

  (टीप : वरील सर्व माहिती ग्रामीण कृषि मौसम सेवा ऐएमएफयु कोल्हापूर, विभागीय कृषि संशोधन केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर यांच्याकडून देण्यात आली आहे.)

  First published:
  top videos

   Tags: Farmer, Kolhapur, Local18, Sangli, Satara, Weather Forecast