कोल्हापूर, 13 जानेवारी : कोल्हापूरहून आता विद्युत मार्गावरील रेल्वेगाड्या धावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या रेल्वेने प्रगतीच्या वाटेवर आणखी एक पाऊल टाकले आहे. तर या विद्युतीकरणामुळे रेल्वेची रोज लागणाऱ्या डिझेलची बचत देखील होत आहे. याआधी कोयना एक्सप्रेस ही कोल्हापूर-मुंबई मार्गावरील रेल्वे विजेच्या इंजिनवर धावण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर आता महालक्ष्मी आणि हरिप्रिया एक्स्प्रेस देखील विद्युत मार्गाने धावू लागल्या आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून सुरू असणारे कोल्हापूर ते पुणे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर चाचणी याआधी घेण्यात आली होती. त्यानंतर कोयना, महालक्ष्मी या रेल्वेगाड्या विद्युत मार्गावर धावू लागल्या आहेत. तर हरिप्रिया एक्स्प्रेस मिरजेपर्यंत इलेक्ट्रिकवर धावण्यास सुरूवात झाली. मिरजेपासून पुढे हुबळीपर्यंत विद्युतीकरणाचे काम अजून पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे मिरजेनंतर मात्र पुढे ती पुन्हा डिझेल इंजिनवर चालवली जाते. पुढे टप्प्या टप्प्याने ही रेल्वेगाडी देखील पूर्णपणे विद्युत मार्गावर धावेल, अशी माहिती कोल्हापूरचे रेल्वेस्थानक व्यवस्थापक विजय कुमार यांनी दिली आहे.
कोणत्याही गाडीच्या प्रवासाचा वेळ अजून कमी झालेला नाही. तर पुढे तीन राज्यांमध्ये धावणाऱ्या अजून तीन रेल्वेगाड्या देखील येत्या दोन महिन्यांत विद्युत मार्गाने धावतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
विद्युत रेल्वेमुळे हे होत आहेत फायदे?
1) एकावेळी कोल्हापूरहून मुंबईला जाऊन परत येण्यासाठी रेल्वेला 5 लाख रुपयांचे डिझेल लागत होते. पण आता इलेक्ट्रिक इंजिन सुरू झाल्यामुळे हे डिझेल वाचत आहे आणि त्यामुळेच विदेशी मुद्रेची देखील बचत होत आहे.
2) डीझेल इंजिनमुळे प्रदूषण देखील होत होते. हे होणारे प्रदूषण देखील आता इलेक्ट्रिकल इंजिन वापरात आल्यामुळे नियंत्रणात राहण्यास मदत होत आहे.
3) कोयना आणि महालक्ष्मी या पूर्णपणे विद्युत मार्गावर धावतात. तर पुढे अजून काही रेल्वेगाड्या देखील विद्युत मार्गावर येतील. यामुळे देखील हा आर्थिक आणि पर्यावरणीय फायदा वाढणार आहे.
Makar Sankrant 2023 : कशी बनवतात भोगीची पारंपरिक भाजी? पाहा Video
भविष्यात प्रवासवेळ होऊ शकतो कमी
रेल्वे प्रशसनाकडून प्रवासाची वेळ कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिथे शक्य आहे तिथे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामांना गती देण्यात आली आहे. त्यामुळे मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच कोल्हापूर ते दिल्ली निजामुद्दीन एक्सप्रेस, अहमदाबाद आणि गोंदिया या एक्स्प्रेस देखील लवकरच इलेक्ट्रिकल लोमोमोटीव्ह इंजिनवर धावणार आहेत. या गाड्या सुरू झाल्यानंतर रेल्वे गाड्यांच्या वेळांमध्येही बदल होऊ शकतो आणि प्रवासवेळ देखील कमी होऊ शकतो असे देखील रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.