कोल्हापूर, 23 जानेवारी : कॅन्सरवर वेळीच औषधोपचार झाले तर हा आजार बरा होऊ शकतो. कॅन्सरच्या पेशंट्समध्ये वाढ होत असल्यानं त्यावरील नवी औषध शोधणे आणि त्यावरील खर्च कमी करणे हे आव्हान आहे. जगभरातील संशोधक यावर काम करतायत. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी एक नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या त्यांच्या संशोधनातून नॅनो मेटल पार्टिकल्स अर्थात नॅनो-धातूकण बनविण्याची सोपी आणि कमी खर्चाची पद्धत आता समोर आली आहे. नुकतेच त्यांनी यासाठी केंद्र सरकारचं पेटंट देखील मिळवलंय. या संशोधनानं कॅन्सरवरील औषधांची कार्यक्षमता वाढणार आहे.
काय आहे संशोधन?
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील डॉ. किरण पवार, मेघा देसाई यांनी हे नवे संशोधन केले आहे. औद्योगिक सांडपाण्यात असणाऱ्या जीवाणूंचे जैवरेणू मिळवून त्यांच्यापासून नॅनो मेटल पार्टिकल्स (नॅनो-धातूकण) बनविण्याची सोपी पद्धत या दोघांनी विकसित केली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स व बायोटेक्नॉलॉजी विभागातील सहाय्यक प्राध्यापक असणारे डॉ. किरण दगडू पवार आणि त्यांच्या विद्यार्थिनी संशोधक मेघा प्रकाश देसाई याबाबत संशोधन करत होते.
या संशोधनात डॉ. पवार व देसाई यांनी नॅनो-धातूकण म्हणजेच मेटल नॅनोपार्टिकल तयार करण्यासाठी उपयोगी असणाऱ्या जिवाणूंपासून बायोमॉलेक्यूल अर्थात जैवरेणूंचे मिश्रण तयार करण्याची नवीन पद्धती विकसित केली आहे. या जैवरेणू मिश्रणाचा उपयोग करून पर्यावरणपूरक, कमी खर्चिक, सुलभ, सोप्या व जलद पद्धतीने मेटल नॅनो पार्टिकल्स तयार केले आहेत.
कोल्हापुरातील हुपरी आणि गोकुळ शिरगाव या ठिकाणच्या औद्योगिक वसाहतीत असणारे सांडपाणी या संशोधनात वापरण्यात आल्याची माहिती डॉ. किरण पवार यांनी दिली.
महिलांनो, कॅन्सरकडं दुर्लक्ष करू नका, मोफत तपासणीचा घ्या फायदा
या संशोधनात मिळवलेल्या जैवरेणू मिश्रणाचा उपयोग करून सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलॅडियम यांसारखे विविध नॅनोपार्टिकल्स तयार करण्यात या दोघा संशोधकांना यश आले आहे. या जैवरेणू मिश्रणापासून द्विधातू (बायोमॅटॅलिक) आणि त्रिधातू (ट्रीमेटॅलिक) नॅनोपार्टिकल्स तयार करण्याच्या पद्धतीवरही पुढील संशोधन करण्यात येत आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
काय होणार फायदे?
या संशोधनात विकसित केलेल्या या पद्धतीने बनवलेल्या धातूकणांचा उपयोग मुख्यतः जैवतंत्रज्ञान व जैव वैद्यकीय क्षेत्रामध्ये होऊ शकतो. कॅन्सरच्या निदानासाठी, उपचारासाठी जी औषधे वापरली जातात, त्यामधील अतिरिक्त प्रमाण कमी करण्यासाठी नवी औषधे या धातूकणांच्या मिश्रणापासून बनवता येऊ शकतात. त्याबरोबरच औषधांची कार्यक्षमता देखील वाढू शकते, असे डॉ. किरण पवार यांनी सांगितले आहे.
या संशोधनासाठी या दोघा संशोधकांना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरु प्रो. पी. एस. पाटील आणि कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.