कोल्हापूर, 13 जानेवारी : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा पडल्याने जिल्ह्याचे राजकारण चांगलचं तापल्याचे दिसून येत आहे. हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील भाजप नेत्यावर नाव न घेता टीका केल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या जिल्ह्यात झडताना दिसत आहेत.
दरम्यान या सगळ्यात आता गोकुळवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. गोकुळच्या संचालिका माजी जिल्हापरिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी गोकुळवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. त्या गोकुळमध्ये सुरू असलेल्या गैरकाभाराचे पुरावे सादर करणार आहेत.
हे ही वाचा : Hasan Mushrif : दिल्लीला चकरा मारणारा तो भाजप नेता कोण?, ईडीच्या छाप्यानंतर मुश्रीफांचा मोठा गौप्यस्फोट
काय म्हणाल्या शौमिका महाडिक?
शौमिका महाडिक यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहले आहे की, गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधाऱ्यांना घाम फोडल्यानंतर मागील जवळपास चार महिने मी शांत होते.. ना पत्रकार परिषद ना विरोधी वक्तव्य.. पण या कालावधीत मी फक्त संघामध्ये चालू असलेल्या गैरकारभाराचे पुरावे जमवत होते.. याचं फळ लवकरच समोर येईल.. आणि त्यानंतर मी पत्रकार बंधू-भगिनींच्या माध्यमातून माझी बाजू जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादकांसमोर पुराव्यानिशी नक्की मांडेन..
शेवटी संयम महत्वाचा असतो.. संयम ठेवा.. जिल्ह्यातील प्रत्येक दूध उत्पादकाला न्याय देण्यासाठी महाडिक कुटुंब बांधील आहे.. आणि तो न्याय आम्ही नक्की मिळवून देऊ.
2017 साली भाजप आणि महाडिक गटाने जिल्हापरिषदेत वर्चस्व मिळवल्यानंतर शौमिका महाडिक या जिल्हापरिषद अध्यक्ष झाल्या होत्या त्यावेळीपासून त्या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय सहभागी झाल्या आहेत. यानंतर 2021 साली झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत त्या 43 मतांनी निवडून आल्यानंतर महादेवराव महाडिक यांच्यानंतर गोकुळमध्ये नेतृत्व करू लागल्या.
हे ही वाचा : Hasan Mushrif ED Raid : मुश्रीफांच्या घरावर छापेमारी सुरू असतानाच ग्रामपंचायत सदस्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या सभेत सत्ताधाऱ्यांना प्रश्नांचा भडिमार करून चांगलच धारेवर धरलं होत. यानंतर त्या मागच्या 4 महिन्यांपासून गोकुळ विषयी कोणतेही स्टेटमेंट केलं नव्हतं त्या पुन्हा सक्रीय झाल्याने गोकुळचं राजकारण तापण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur