Home /News /maharashtra /

शिवसेनेला आणखी एक झटका, कोल्हापूरचे पाच माजी आमदार गोव्यात दाखल, सूरत पाठोपाठ गोव्यात घडामोडींना वेग

शिवसेनेला आणखी एक झटका, कोल्हापूरचे पाच माजी आमदार गोव्यात दाखल, सूरत पाठोपाठ गोव्यात घडामोडींना वेग

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

    कोल्हापूर, 21 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या राजकीय घडामोडींचं केंद्रस्थान महाराष्ट्राची राजधानी मुंबई असली तरी शेजारच्या राज्यांमध्ये घडणाऱ्या घडामोडींकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर गुजरात राज्यात प्रचंड घडोमोडी घडत आहे. एकनाथ शिंदे आपल्या सर्व 35 समर्थक आमदारांना गुजरातमध्येच घेऊन गेले आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये घडणाऱ्या घडामोडींकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोल्हापुरातील शिवसेनेचे सर्व माजी आमदार गोव्यात दाखल झाले आहेत. हे सर्व माजी आमदार एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत, अशी देखील माहिती समोर येत आहे. या माजी आमदारांमध्ये उल्हास पाटील, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर या सर्वांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सत्यजीत पाटील हे सर्वजण गोव्यात एकाचठिकाणी आहेत. तर सूरतला गेलेल्या आमदारांमध्ये कोल्हापूरचे आमदार प्रकाश आबिटकर, सांगलीचे अनिल बाबर, सातारा जिल्ह्यातील शंभूराजे देसाई, महेश शिंदे यांचा समावेश आहे. या सर्व घडामोडींमुळे पश्चिम महाराष्ट्रातील पाच आमदारांनी थेट शिवसेनेलाच आव्हान दिलं आहे. (एकनाथ शिंदे मंत्रीपदाचा राजीनामा देणार, सूत्रांची माहिती, गुजरातमध्ये घडामोडींना वेग) कोल्हापूरच्या शिवसेनेच्या ज्या माजी आमदारांनी गोवा गाठलं आहे ते 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. या माजी आमदारांमधील बरेच जण पक्षावर नाराज होते. दरम्यान, राजेश क्षीरसागर यांचं राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्षपद कायम राहिलं होतं. पण इतर माजी आमदारांच्या हाती राज्यात शिवसेनेची सत्ता असूनही काहीच नव्हतं. त्यामुळे त्यांच्या मनात नाराजी होती. विशेष म्हणजे गोव्यात गेलेले शिवसेनेचे पाचही माजी आमदार यांचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. ते शिंदे यांचे समर्थक आहेत. राज्यात एवढ्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना शिवसेनेच्या पाच माजी आमदारांनी देखील गोवा गाठणं हे संकेत देखील महाविकास आघाडी सरकारसाठी धोक्याचे ठरु शकतात. आता या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि गोव्याकडील घडामोडींवर महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सरकार खरंच कोसळतं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डॅमेज कंट्रोल करण्यात यश येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या