कोल्हापूर, 1 मार्च : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी यावेळी आयएनएस विक्रांतवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी कोणतेही आरोप करण्यापेक्षा विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेला पैसा कुठे ठेवला हे आधी सांगावं असं राऊत यांनी म्हटलं आहे.
राऊत यांनी नेमकं काय म्हटलं?
संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या यांनी लाखो करोडो रुपये गोळा केले, त्याची चौकशी सुरू असताना सरकार बदललं आणि चौकशी थांबली. पण मी स्वतः विक्रांतचे पैसे कुठे गेले आहे विचारणार आहे. मी त्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्या यांनी कोणतेही आरोप करण्यापेक्षा विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेला पैसा कुठे ठेवला हे आधी सांगावं आणि मग बोलावं, असंही यावेळी राऊत यांनी म्हटलं आहे.
राऊतांचा शिंदे सरकारला टोला
दरम्यान यावेळी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारला देखील टोला लगावला आहे. सरकार बदलताच अनेकांना क्लिनचीट दिली. पण दुसरीकडे जो जाब विचारतो त्याला तुरुंगात टाकायचं, खोटे गुन्हे दाखल करायचे, बदनाम करायचं असं षडयत्र रचलं जात आहे. मात्र जनताच 2024 ला याचा सर्व हिशोब पूर्ण करेल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मी जेव्हा कोल्हापूरला आलो तेव्हा शिवसेना पूर्वीपेक्षा अधिक जोमाने वाढत असल्याचं मला दिसलं असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Eknath Shinde, Kirit Somaiya, Sanjay raut, Shiv sena