Home /News /maharashtra /

कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांची पुन्हा अग्निपरिक्षा, सतेज पाटलांचं चॅलेंज!

कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांची पुन्हा अग्निपरिक्षा, सतेज पाटलांचं चॅलेंज!

महाविकास आघाडीने संजय पवार तर भाजपने धनंजय महाडिक यांना मैदानात उतरले आहे. हे दोघेही विजयाचा दावा करत आहेत.

    ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 4 जून : राज्यसभेच्या निमित्ताने कोल्हापूरचे उमेदवार सहाव्या जागेसाठी मैदानात उतरले आहेत. याच सहाव्या जागेवरून ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे साहजिकच कोल्हापूरचे दोन पाटील पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. उमेदवारांऐवजी सतेज पाटील (Satej Patil) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात सामना होणार आहे. राज्यसभेचे कुस्ती मैदान मुंबईत भरले असले तरी ज्या सहाव्या जागेची प्रतिष्ठेची कुस्ती आहे त्यामध्ये कोल्हापूरचे पैलवान उतरले आहेत. या कुस्तीमुळे कोल्हापूरच्या राजकारणातही वातावरण चांगलंच तापले आहे. महाविकास आघाडीने संजय पवार तर भाजपने धनंजय महाडिक यांना मैदानात उतरले आहे. हे दोघेही विजयाचा दावा करत आहेत. या दोघा पैलवानांनी विजयाचा दावा केला असला तरी त्यांच्या वस्तादांनीही हे पैलवान विजयी व्हावे यासाठी आता आकडेमोड करायला सुरुवात केली आहे. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचे वस्ताद असलेले चंद्रकांत पाटील यांनी महाडिकांना कोणत्याही स्थितीत यावेळी गुलाल लावायचाच हा चंग बांधला आहे. चंद्रकांत पाटलांना भाजप वाढवायला महाडिक कुटुंबाने मदत केली. मात्र त्या तुलनेत महाडिक कुटुंबाला भाजपकडून बळ मिळाले नाही. उलट सतेज पाटील यांच्या विरोधातील विधान परिषद निवडणुकीला अमल महाडिक यांना माघार घ्यायला लागली आणि राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या सतेज पाटलांना बाय देण्याची वेळ महाडिकांवर आली. त्यामुळे महाडिक गट बॅकफूटला गेला. राज्यसभेच्या निवडणुकीतही महाडिकांवर माघार घेण्याची वेळ येते की काय अशी स्थिती होती. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांचाच उमेदवार माघार घेण्याची विनंती भाजपने करत लढण्याची तयारी दाखवली. त्यामुळे धनंजय महाडिक आता रिंगणात असून त्यांच्या विजयाचे दावे भाजपचे नेते करत आहेत. (भाजपचं मिशन लोटस ठरलं, राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील तीन नेत्यांवर मोठी जबाबदारी) आता धनंजय महाडिक रिंगणात उतरल्याने साहजिकच त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या सतेज पाटील यांची प्रतिष्टा पणाला लागली आहे. महाडिक जिथे जिथे तिथे त्यांच्या विरोधात अगदी पक्षीय पातळी सोडून सतेज पाटील मैदानात उतरले आहेत. या पूर्वीही धनंजय महाडिक राष्ट्रवादीत असताना आणि काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असताना सतेज पाटील यांनी सेनेच्या संजय मंडलिक याना आमचं ठरलंय म्हणत निवडून आणल्याचा इतिहास आहे. त्यामुळे आताही महाडिक रिंगणात असल्याने महाविकास आघाडीच्या संजय पवार यांच्या पाठीशी सतेज पाटील हे ताकद लावणार हे निश्चित आहे. तसे सूतोवाचही त्यांनी दिले आहेत. एकूणच राज्यसभेच्या या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीनंतर या निवडणुकीत सतेज पाटील यांचा सामना करावा लागणार आहे. या निवडणुकीत भाजपला रोखण्याचे गणितच सतेज पाटील यांनी देशासमोर मांडले होते. शिवाय महाडिक यांच्या विरोधात राबवायचे निवडणुकीची सगळी अस्त्रे सतेज पटलांच्याकडे तयार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी त्याचा वापर करून महाडिकांचा आणि पर्यायाने भाजपचा पराभव करण्याची व्युव्हरचना आखत आहे. त्यामुळे सतेज पाटील कोल्हापुरातून शिवसेनेला आणखी एक खासदार देण्यात यशस्वी होणार की चंद्रकांत पाटील महाडिकांना गुलाल लावण्यात यशस्वी होतात हे 10 जूनलाच समजणार आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या