साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर 16 मार्च : सोन्याचे दागिने विकत घेताना नेहमी हॉलमार्क असलेले सोनेच घ्यावे. मात्र 4 अंकी हॉलमार्किंग आणि 6 अंकी हॉलमार्किंगबाबत ग्राहकांमध्ये बरेच संभ्रम आहेत. त्यासाठीच सरकारने आता एक नवीन नियम आणला आहे. ज्याचा फायदा सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना होणार आहे.
केंद्र सरकारने सोने आणि दागिन्यांच्या खरेदी-विक्रीचे नियम आता बदलले आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं जाहीर केलेल्या या निर्णयानुसार 31 मार्च 2023 नंतर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय कोणतेच सोन्याचे दागिने आणि कलाकृतींची विक्री होणार नाही.
4 अंकी हॉलमार्किंग आणि 6 अंकी हॉलमार्किंग याबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन नियमानुसार, 1 एप्रिलपासून, फक्त सहा अंकांसह अल्फा न्यूमरिक हॉलमार्किंगच वैध असणार आहे. तर पूर्वीचे 4 अंकी हॉलमार्किंग आता पूर्णपणे बंद केले जाणार आहे.
Gold Silver Rule Change : सोनं खरेदी करण्याआधी ही बातमी पाहाच, कारण आता बदललाय नियम
भारतीय मानक ब्यूरो अर्थात BIS कडून 2005 पासून प्रत्येक सोन्याच्या दागिन्यासाठी हॉलमार्क करण्याची पद्धत सुरू झाली. जून 2021 मध्ये भारतात हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार 2 ग्रॅमच्यावर कोणताही दागिना सराफाला हॉलमार्किंग केल्याशिवाय विकता येत नाही. असे कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी सांगितले.
नव्या नियमात काय बदल?
यापूर्वीच्या नियमानुसार हॉलमार्किंग केलेल्या दागिन्यांवर 5 मार्क असायचे. त्यामध्ये BIS चा लोगो, दागिना किती कॅरेटचा आहे, कोणत्या सेंटरवर हॉलमार्किंग केले आहे, हॉलमार्किंग झालेल्या वर्षाचा कोड आणि कुठल्या सराफाने विकले त्याचा लोगो अशी चिन्हे असत. मात्र आता जो HUID हॉलमार्किंगमध्ये BIS चा लोगो, दागिना किती कॅरेटचा आहे, 6 अंकी अल्फान्युमरिक कोड मार्किंग केलेले असतात, असे ओसवाल यांनी स्पष्ट केलं.
काय होणार फायदा?
या हॉलमार्किंगमुळे ग्राहकांना दागिना सुरक्षित राहण्याची खात्री मिळणार आहे. BIS च्या पोर्टलवर ग्राहक HUID नंबर टाकून केव्हाही आपल्या दागिन्यांबाबतची संपूर्ण माहिती स्वतः पाहू शकतात. त्यामुळे तो दागिना मोडायचा असेल, किंवा दुर्दैवाने तो कुठे चोरीला गेला, हरवला तरी त्याची सर्व माहिती या पोर्टलवर मिळेल. हॉलमार्किंग क्रमांकाच्या मदतीने ग्राहकाला सोने आणि त्याच्या दागिन्यांशी संबंधित सर्व माहिती मिळणार आहे. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता बरीच कमी होईल, असेही भरत ओसवाल यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.