ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी
कोल्हापूर, 20 जानेवारी : कोल्हापुरात बोगस डॉक्टर विजय कोळूस्कर आणि श्रीमंत पाटील यांना गर्भलिंग निदान करताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही घटना ताजी असतानाच आता कोल्हापुरातून आणखी याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गर्भलिंग निदान प्रकरणाची व्याप्ती आता वाढत आहे. कोल्हापुरात आणखी चार जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
यामुळे या संदर्भात अटक केलेल्यांची एकूण संख्या आठ झाली आहे. यामध्ये एका डॉक्टरांचा आणि एका नर्सचा सुद्धा समावेश आहे. दोन दिवसापूर्वी कोल्हापूर पोलिस आणि आरोग्य विभागाने संयुक्त छापे टाकत राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील गर्भलिंग निदान आणि गर्भपाताची केंद्रे उध्वस्त केले आणि बोगस डॉक्टर आणि एजंट यांना अटक केली होती.
याचा तपास करत असताना एका नर्सचाही यामध्ये समावेश असल्याचं आढळून आलं आहे. ही नर्स गर्भपाताचे काम करत होती. तर इलेक्ट्रोपॅथी प्रॅक्टिस करणारा एक डॉक्टर गर्भपाताची औषधे लिहून देत होता. या सगळ्यांच्या मुस्क्या पोलिसांनी आवळल्या आहे. दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, 17 जानेवारीला कोल्हापुरात बोगस डॉक्टर विजय कोळूस्कर आणि श्रीमंत पाटील यांना गर्भलिंग निदान करताना रंगेहाथ पकडले होते. पोलिसांनी 17 तारखेला मडीलगे आणि राधानगरी येथे छापे घातले. यात मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मडीलगे येथे गर्भलिंग निदानचे मशीन, गर्भपाताची औषधेही सापडली होती. तर राधानगरीमध्येही सोनग्राफी मशीन पकडले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur