कोल्हापूर, 22 मार्च, ज्ञानेश्वर साळोखे : एका बाजूला महापालिकेच्या शाळा बंद पडत असल्याचे दृश्य असताना दुसऱ्या बाजूला कोल्हापूरच्या महापालिका शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी चक्क पालकांनी शाळेत रात्र झोपून काढल्याचं चित्र आहे. खासगी संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी चढाओढ आपण नेहमीच पाहतो, पण महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी गर्दी होणारी राज्यातील ही पहिलीच शाळा ठरलीये.
पालकांची गर्दी
महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांची झालेली गर्दी चर्चेचा विषय ठरलीये. नेहमी खासगी शाळेत दिसणारे दृश्य गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरच्या जरगनगर शाळेत दिसत आहे. यावर्षी तर प्रवेश मिळवण्यासाठी पालकांनी चक्क रात्र जागून काढलीये. तर काही जण अंथरून घेऊनच शाळेत आले. मात्र तरीही काहींच्या पाल्यांना प्रवेश मिळाले नाही, त्यामुळे त्यांची निराशा झाली.
जरगनगर पॅटर्न
महानगरपालिकेच्या या शाळेने स्वतःचा जरगनगर पॅटर्न निर्माण केला आहे. राज्याच्या शिष्यवृत्तीच्या यादीत या शाळेची मुले गेल्या काही वर्षांपासून झळकत आहेत. लहान वयातच स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी या शाळेत केली जाते. त्यामुळे पालकांचा ओढा या शाळेकडे वाढला आहे.
तुळजापुरात गुढीपाडव्याचा उत्साह; तुळजाभवानी मंदिरात उभारली गुढी, पहा खास फोटो
आतापर्यंत सरकारी शाळांच्या गुणवत्तेचा दिल्ली पॅटर्न आपणाला माहीत आहे. तिथल्या सरकारने शाळांना भरघोस निधी देत त्यांचा कायापालट केला आहे. महाराष्ट्रात सुद्धा असा शैक्षणिक बदल होऊ शकतो हे या जरगनगर शाळेने दाखवून दिले आहे. मुलांच्या भवितव्यासाठी सरकारी शाळेतील शिक्षकांची राबण्याची तयारी आहे. आता सरकारने या शाळा ओस पडू न देता त्यांचा कायापालट करण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur