मुंबई, 11 ऑक्टोंबर : मागच्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. दरम्यान आज(दि.11) तारखेपासून परतीचा पाऊस असेल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. परंतु मागच्या काल पासून सुरू झालेल्या पावसाने थैमान घालण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात मुंबईसह उपनगरात काल(दि.10) पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला होता. परंतु मुंबई परिसरात पाऊस झाला नाही परंतु कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पावसाने थैमान घातले. दरम्यान आज पहाटे पासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झालेला पाऊस अद्यापही सुरू आहे. काही भागात पावसाच्या पाण्याने रस्ते बंद झाले आहेत.
दरम्यान काल मुंबई परिसरात पाऊस झाला नसला तरी वातावरणात दमटपणा होता. यामुळे मुंबईकरांना अधिक अस्वस्थता जाणवत होती. हवामान खात्याच्या माहितीनुसार आज मंगळवारी आणि बुधवारीही मुंबईमध्ये यलो अॅलर्ट असून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात कालपासून झालेल्या पावसाने मात्र पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. याचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
हे ही वाचा : Success Story : लाकडातून साकारल्या भन्नाट कलाकृती, विदेशातही होतेय दमदार विक्री, Video
अचानक आलेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ
गेल्या आठवड्यात अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची ताराबंळ उडाली होती. यानंतर मुंबईत पावसाने दडी जरी मारली असली तरी ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवल्याचे प्रखर्षाने दिसून आले. कुलाबा येथे सोमवारी 31.2 तर सांताक्रूझ येथे 31.5 अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे 1.1 आणि 1.2 अंशांनी कमी होते.
पुढील दोन दिवस तापमान 32 अंशांच्या आसपास असेल तसेच आभाळ अंशतः ढगाळलेले राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस मुंबईत अस्वस्थता निर्देशांक चढा राहील, असा अंदाज आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने सोमवारी दिलेल्या पूर्वानुमानानुसार मुंबईमध्ये मंगळवार आणि बुधवारी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्येही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातही पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
हे ही वाचा : रात्रीच्या जेवणानंतर चालणे खरंच शरीरासाठी फायद्याचं? जाणून घ्या सविस्तर
विदर्भातील पावसाचे प्रमाण मंगळवारनंतर कमी होईल. पालघर, ठाणे, मुंबई येथे शुक्रवारी कोरड्या वातावरणाचीही शक्यता आहे. प्रणालीचा प्रभाव कमी झाल्यानंतर वातावरणीय घटक लक्षात घेऊन मग नैऋत्य मौसमी पावसाची माघारही जाहीर होऊ शकते, असा अंदाज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai rain, Pune rain, Rain fall, Rain flood, Rain in kolhapur, Weather update, Weather warnings