मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भाजलेल्या रुग्णांना नवं आयुष्य देणारं त्वाचादान, काय आहे ते करण्याची पद्धत? पाहा Video

भाजलेल्या रुग्णांना नवं आयुष्य देणारं त्वाचादान, काय आहे ते करण्याची पद्धत? पाहा Video

X
त्वचादान

त्वचादान करून आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो. काय आहे ते करण्याची पद्धत जाणून घ्या.

त्वचादान करून आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो. काय आहे ते करण्याची पद्धत जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

    साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी

    कोल्हापूर, 23 मार्च : सामान्यतः रक्तदान, नेत्रदान, देहदान यांच्याबद्दल जनजागृती बाबतचे उपक्रम नेहमीच राबविले जात असतात. मात्र, यामध्ये अजून एका गोष्टीचे दान सध्या गरजेचे बनत आहे. ते म्हणजे त्वचादान. आपली त्वचा देखील आपण दान करून एखाद्याचा जीव वाचवू शकतो आणि हेच शक्य आहे ते म्हणजे त्वचापेढी अर्थात स्किन बँकमुळे. भारतात काही ठिकाणी सध्या स्किन बँक कार्यरत आहेत. ज्यापैकी एक सांगली येथे आहे.

     भाजलेल्या रुग्णांना नवे जीवदान

    या स्किन बँकमुळे आजवर अनेक भाजलेल्या रुग्णांना नवे जीवदान मिळाले आहे. सध्या इतर अवयव दानांच्या बद्दल नागरीकांना समजावून सांगितले जात असते. मात्र आता त्वचादाना बद्दलचे महत्त्वही नागरिकांना पटवून देणे गरजेचे बनले आहे. भारतामध्ये दरवर्षी 70 लाख व्यक्ती निरनिराळ्या कारणांमुळे भाजतात.

    त्यापैकी सुमारे 1,40,000 जण योग्य उपचारांअभावी मरण पावतात. यामधील 70 टक्के रुग्ण 15 ते 38 वयोगटातील असतात. आणि यामध्ये स्वयंपाकघरात भाजलेल्या स्त्रियांचे प्रमाण 80 टक्के असते. फक्त मुंबईमध्ये प्रतीवर्षी 1000 व्यक्ती भाजल्यामुळे मरतात, यापैकी बहुतांश जणांना त्वचा प्रत्यारोपणाद्वारे वाचवता येते. त्यामुळेच नागरिकांना आजच्या घडीला त्वचा दान म्हणजे नेमके काय असते हे सांगणे आवश्यक आहे, असं सांगली येथील रोटरी स्किन बँक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप पटवर्धन यांनी सांगितले.

    काय असते त्वचा दान ?

    ज्याप्रमाणे आपण मृत्यू पश्चात देह किंवा इतर अवयव दान करतो, त्याच प्रमाणे मृत्यू नंतर आपण आपल्या त्वचेचा काही भाग दान करू शकतो. सहा तासांच्या आत, मांडी व पाठीवरील त्वचेचा पातळ भाग दान केल्याने अनेक मानवी जीव वाचू शकतात. यामध्ये फक्त त्वचेचा अत्यंत पातळ पापुद्रा काढला जातो. यामध्ये ना रक्तस्त्राव होतो, नाही शरीर विद्रुप होते.

    का महत्त्वाचे आहे त्वचा दान ?

    30 टक्के पेक्षा जास्त भाजलेल्या केसेसमध्ये रुग्ण दगावण्याचे प्रमाण जास्त असतं. कारण जखमा खोलवर झालेल्या असतात. प्रत्येक रुग्णाला भाजल्यानंतर चे 15 ते 20 दिवस असे असतात, की त्यांना संरक्षणात्मक त्वचेची गरज असते. अशा वेळी मृत व्यक्तीची घेतलेली त्वचा वरदान ठरते, असे डॉ. पटवर्धन सांगतात.

    Latur News : विलासरावांच्या गावाचा थाटच भारी, स्थानिक प्रश्नासाठी थेट स्वित्झर्लंडची टेक्नॉलजी, Video

    त्वचेच्या या पांघरुणामुळे भाजलेल्या रुग्णाच्या जखमेतून पाझरणारा रक्तातील प्लाज्मा आणि प्रथिने वाया जात नाहीत, तसेच रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमी होत नाही. जंतूंचा प्रादुर्भाव न झाल्यामुळे सेप्टिसीमिया या सारख्या जीवघेण्या आजारापासून बचाव होतो. बऱ्याचदा महिलांवर ॲसिड फेकून अत्याचार केले जातात. त्यामुळे त्यांना विद्रूपपणा येतो, त्यांच्यामधील आत्मविश्वास घटण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच त्यांना मानसिक धक्क्यातून सावरण्यास वेळ लागतो, याला आळा घालण्यासाठी त्वचापिढी संजीवनी ठरते, असेही डॉ. पटवर्धन यांनी सांगितले.

    रुग्णाला काय आहेत त्वचा प्रत्यारोपणाचे फायदे ?

    1) जंतू संसर्ग टाळता येतो.

    2) दाह कमी होतो.

    3) जखमा लवकर बऱ्या होतात..

    4) रुग्णाची प्रतिकार शक्ति वाढते.

    कुठे करता येते त्वचादान ?

    सध्या भारतात काही ठिकाणी अशा स्किन बँक कार्यरत आहेत. ज्यापैकी एक सांगली येथे आहे. मृत्यु पासून 6 तासांच्या आत बर्नस् हेल्पलाईन क्र. +91 233232928 वर संपर्क केल्यानंतर त्वचा दान शक्य आहे. वर्दी मिळाल्यापासून 2 तासांच्या आत, त्वचा काढणारे प्रशिक्षित कर्मचारी आपल्याकडे पोहचतात आणि उपयुक्त त्वचा काढून घेतात. त्वचा काढलेल्या भागावर काळजीपूर्वक बँडेज करून मृतदेह परत दिला जातो.

    आता घाला गायीच्या शेणापासून बनवलेली कोल्हापुरी चप्पल, आरोग्यालाही आहेत फायदे! Video

    काय आहे त्वचा दात्यांसाठीची पात्रता ?

    1) त्वचा दान करणाऱ्याचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.

    2) त्याला कोणताही त्वचाविकार नसावा.

    3) त्याला एडस् किवा हिपेटेटीस सी नसावा.

    4) त्याचबरोबर त्याला त्वचेचा कर्करोगही नसावा.

    आजच्या घडीला भाजलेल्या अनेक रुग्णांना सहाय्य करण्यासाठी आणि एखाद्याला जीवदान देण्यासाठी हे त्वचादान अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे याची जास्तीत जास्त नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे.

    First published:
    top videos

      Tags: Health, Kolhapur, Local18