कोल्हापूर, 4 डिसेंबर : प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानच्या कबरीचे अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर विशाळगडावरचेही बांधकाम पाडावे, अशी मागणी शिवप्रेमी करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज संभाजीराजे छत्रपती यानी विशाळगडाची पाहणी केली. यावेळी विशाळगडाचा कोंडाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गडावर अवैध धंदे सुरू असल्याने ते चांगलेच संतप्त झालेत. शिवप्रेमी असाल तर गडावर येऊन परिस्थिती पाहा, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात हे पाहाणे महत्त्वाचे आहे.
महाशिवरात्रीपर्यंत अतिक्रमणे काढावीत अन्यथा..
विशाळगडावरचे अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी आता शिवप्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विशाळगडावरील अवैध धंदे सुरू असल्याने शिवप्रेमी संतप्त असून त्यांचा जर उद्रेक झाला तर त्यांच्यासोबत मी सुद्धा असेल हे विसरु नका म्हणत ह्या गडाला मोकळा श्वास घेऊ द्या, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. तर शिवप्रेमींनी महाशिवरात्रीपर्यंत ही अतिक्रमणे काढावीत अन्यथा ती उध्वस्त करू असा इशारा दिला आहे.
अफझल खान कबरीजवळ अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खान कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अफझलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमणाचा वाद 1990 पासून सुरू होता. अफझलखानाच्या कबरीभोवती वनखात्याच्या हद्दीत काही अतिक्रमणे केली जात होती. दर्गा बांधण्यात येत होता. तसेच, अफझलखानाचे दैवतीकरण केले होते. तसा आरोपही 1990 सालीच करण्यात आला होता. या आरोपानंतर सुरू झालेला वाद अद्याप सुरूच आहे.
याप्रकरणी न्यायालयाने 2017 साली निर्णय देत अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर अद्याप कारवाई झाली नव्हती. 1980 ते 85 या कालावधीत अफझलखानाच्या कबरीजवळ अतिक्रमण व्हायला सुरुवात झाल्याची माहिती मिळते. याठिकाणी उरूसही भरवण्यात आला होता. त्यानंतर या कबरीचे दर्शन घेण्याची सक्तीही करण्यात येऊ लागली. यावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज उठवला होता. त्यानंतर ही कबर सामान्यांसाठी बंद झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.