कोल्हापूर, 04 ऑगस्ट : दिड महिन्यांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुख्यमंत्री पदाची शपथ घेत सत्ता स्थापन केली. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 41 आमदार सोबत गेले. यानंतर मागच्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेतील 12 खासदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन खासदारांचाही समावेश होता. परंतु दोन्ही खासदारांनी आपल्या फेसबुकच्या कमेंट सेक्शन बंद केल्याने मतदार संघात जोरदार चर्चा सुरू आहे. (Kolhapur Shiv sena)
कोल्हापूरचे खासदार संजय मंडलीक आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटासोबत गेल्याने कोल्हापूर शिवसेनेच्यावतीने त्यांच्यावर टीका करण्यात आली. दरम्यान दोन्ही खासदारांनी बंडखोरी केल्यापासून सोशल मिडीयावर व्यक्त होताना काळजी घेतली आहे. खासदार मंडलीक आणि खासदार माने हे फेसबुकवर कोणतीही माहिती देताना पहिला कमेंट बॉक्स बंद करून माहिती टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे जिल्ह्यात खासदारांनी का कमेंट बॉक्स बंद केला आहे. याबाबत चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर, भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली
दरम्यान खासदार धैर्यशील माने यांनी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून हा कमेंट बॉक्स बंद केल्याची चर्चा आहे. खासदार माने एकनाथ शिंदे गटासोबत गेल्यानंतर पुढच्या काही दिवसांत त्यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याच्या आवाहनाची पोस्ट केली होती.
ते म्हणाले होते कि, शिवसेनेचे काही पदाधिकारी भावनाविवश झाल्यामुळे नेमकं हे का घडलं? कशामुळे घडलं? यासाठी त्यांचा होणारा आक्रोश व संवेदना मी एक शिवसैनिक म्हणून समजू शकतो. याच उत्तर घेण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला कुठल्याही प्रकारचा विरोध होता कामा नये. मोर्चामध्ये सहभागी होणारा प्रत्येकजण हे आपलेच बंधू भगिनी आहेत व त्यांचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणं हे त्यांचा सहकारी म्हणून माझं कर्तव्य आहे. परंतु त्यांनी यावर अजुनही कोणता खुलासा केला नाही. या पोस्टवेळीही त्यांनी फेसबुक कमेंट बॉक्स बंदच ठेवला होता.
हे ही वाचा : शिवसेनेच्या चिन्हावर निर्णय घेऊ नका, कोर्टाचा महत्त्वाचा आदेश, पुढील सुनावणी सोमवारी
कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरे खासदार संजय मंडलीक यांनी आपल्या फेसबुकवर कमेंट बॉक्स बंद ठेवला आहे. खासदार मंडलीक यांनी जिला बँकेच्या निवडणुकीपासून जिल्ह्यातील महाविकास आघाडीला खिंडार पाडले होते. त्यामुळे त्यांनी घेतलेली भुमिका त्यांच्या राजकीय हितासाठी घेतली असेल अशी चर्चा केली जात असली तरी जिल्ह्यातील शिवसैनिक त्यांच्यावर नाराज असल्याचे दिसून आले. याबाबत दोन्ही खासदारांवर जिल्हाध्यक्ष संजय पवारांनी तिव्र नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान दोन्ही खासदारांनी एक महिना होत आला तरी मतदार संघात आले नसल्याचीही खंत व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Facebook, Kolhapur, Sanjay mandlik, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)