कोल्हापूर, 11 सप्टेंबर : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाने थैमान घातल्याने राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. (Kolhapur Rain Alert) कोल्हापूर जिल्ह्यात घाट माथ्यासह विविध ठिकाणी पावसाने जोरदार सुरूवात केली आहे. आज (दि. 11) सकाळी 11 च्या सुमारास राधानगरी धरणाचा 6 नंबरचा स्वयंचलीत दरवाजा खुला झाला. यानंतर पाठोपाठ तासाबराच्या अंतराने अजून दोन दरवाजे उघडल्याची माहिती देण्यात आली.
या दरवाज्यांमधून 5884 क्युसेक्स तर विजगृहातून 1600 क्युसेकस असा एकूण 7484 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. गेल्या चोवीस तासांत 79 मीमी पाऊस झाला असून जूनपासून आजअखेर 3913 मीमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हे ही वाचा : कुठे ऑरेंज अलर्ट तर कुठे येलो अलर्ट राज्यात असा आहे पावसाचा अंदाज
कसबा बावडा येथील राजाराम बंधारा तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. तर कालपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी 17 फुटावर गेली आहे. बंधाऱ्यावरून यातूनच धोकादायकरित्या वाहतूक सुरू आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात चौथ्यांदा राजाराम बंधाऱ्यावरून पंचगंगेचे पाणी वाहत आहे. याचबरोबर जिल्ह्यातील अन्य बंधारेही पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुढचे दोन दिवस पाऊस असाच राहिल्यास नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे.
राज्यात पावसाचा येलो अलर्ट
संपूर्ण कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांना हवामान विभागानं पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. मात्र आगामी दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून रविवार आणि सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हे ही वाचा : कोकणात पावसाची जोरदार बॅटींग, भात शेतीचे मोठे नुकसान, गावांचा संपर्क तुटला
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याशी शक्यता वर्तविली आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, रत्नागिरी, महाड, कोकण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
आता हंगामातील अखेरच्या महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सप्टेंबरच्या मध्यानंतर वायव्य भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याचा अंदाज आहे. हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले, की सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे. राज्याच्या सर्वच भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Radhanagri, Rain fall, Rain flood, Rain in kolhapur