कोल्हापूर, 23 ऑक्टोबर : एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा होता. शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादीला घरघर लागल्याचे दिसून येत आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी दिल्यानंतर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. यानंतर आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षच ए. वाय. पाटील नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देण्याचे ठरवले आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादीला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पाटील हे मागच्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादीत काम करत असल्याने त्यांनी राधानगरी परिसरात आपलं स्थान निर्माण केलं होतं. याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते हसन मुश्रीफ यांनी ए. वाय. पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी मनधरणी धुडकावली आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजीकडे नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने पक्षाला मोठा फटका बसत आहे. पाटील आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता असून, जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.
हे ही वाचा : 'शंका कशाला घ्यायची', उद्धव ठाकरेंची पाठराखण करत पवारांनी भाजपला फटकारलं
काल (दि.22) सोळांकूर येथे ए. वाय. पाटील यांनी आपल्या गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आज (दि.23) सकाळपासून राधानगरी तालुक्यातील गावागावांत ए. वाय. पाटील समर्थकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करून भविष्यातील लढाईसाठी हातात ढाल-तलवार घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
गडबडीने निर्णय घेऊ नका मुश्रीफांचा फोन
सोळांकूरमधील बैठकीतील निर्णयाची कुणकुण लागताच दुपारी आ. हसन मुश्रीफ यांनी ए. वाय. पाटील यांच्याशी थेट संपर्क साधून गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका, अशी विनंती केली. मात्र, आता उशीर झाला असून मी फार पुढे गेलो आहे, माझा राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय झाला आहे, असे ए. वाय. पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.
हे ही वाचा : CM च्या पक्षातील नेताच म्हणतो, 'एकनाथ शिंदेंचा होणार रामदास आठवले', शिवसेनेचा खुलासा
ए. वाय. पाटील राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यास राधानगरी तालुक्यात घड्याळाची टिक्टिक् मंदावणार असून, ढाल-तलवारीचा खणखणाट वाढणार आहे. माजी आमदार के. पी. पाटील यांची साथ सोडून राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा त्याग करणारे ए.वाय. हे दुसरे जिल्हाध्यक्ष ठरणार आहेत. यापूर्वी लेमनराव निकम यांनीही 2009 मध्ये के. पी. पाटील यांची साथ सोडत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन प्रकाश आबिटकर यांना साथ दिली होती. यावेळीही तशीच पुनरावृत्ती होण्याचे संकेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, NCP, Sharad Pawar