सांगली, 19 जानेवारी : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीचे निकाल (Kavathe Mahankal Nagar Panchayat Election Result) देखील आता समोर येऊ लागले आहेत. या नगरपंचायतीकडे राज्याचं लक्ष असण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे 23 वर्षांचे चिरंजीव रोहित पाटील हे या निवडणुकीचं नेतृत्व करताना दिसत होते. अखेर या निवडणुकीचे जे निकाल जाहीर आले आहेत त्या निकालात रोहित पाटलांनी बाजी मारल्याचं दृश्य आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीमध्ये रोहित आर आर पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दणदणीत विजय मिळवला आहे. 17 पैकी दहा जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. रोहित पाटलांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी कवठेमहांकाळ नगर पंचायत निवडणुकीमध्ये झाली होती. माजी खासदार संजय काका पाटील, शिवसेनेचे नेते माजी मंत्री अजित घोरपडे, राष्ट्रवादीचा एक गट आणि काँग्रेस अशी शेतकरी विकास आघाडी रोहित पाटलांच्या विरोधात होती. अत्यंत या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायती वर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. रोहित पाटील यांनी या निवडणुकीमध्ये स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली होती.
कवठेमहांकाळ नगरपंचायत
राष्ट्रवादी काँग्रेस | 10 |
शेतकरी विकास आघाडी | 6 |
भाजपा | - |
आरपीआय | - |
अपक्ष | 1 |
रोहित पवारांचं निर्विवाद वर्चस्व
कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं पुन्हा एकदा निर्विवाद असं वर्चस्व राहिलं आहे. कारण आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार एकणू 17 जागांपैकी रोहित पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष पुरस्कृत उमेदवारांचा 11 जागांवर विजय झाला आहे. तसेच एक जागेवर राष्ट्रवादीचा बिनविरोध विजय झालाय. त्यामुळे राष्ट्रवादीने एकूण 12 जागांवरील विजय खिशात घातला आहे. तर राम शिंदे यांच्या गटाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दुसरीकडे या नगरपंचयातीत काँग्रेसलाही 3 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे कर्जतच्या नगरपंचायत निवडणुकीच महाविकास आघाडीचा तब्बल 15 जागांवर विजय झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election, Maharashtra politics, Sangli