कोल्हापूर, 13 जानेवारी : आदिमानव स्वत:चं पोट भरण्यासाठी जंगलात कंदमुळांवर अवलंबून असायचा. त्यानंतर हळूहळू त्याला इतर खाद्य मिळू लागल्याने या कंदमुळांचा वापर कमी होऊ लागला. सध्या तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना रोजच्या वापरात असलेल्या कंदमुळांची नावे देखील माहित नसतात. यामुळेच कोल्हापुरात कंदमुळांचा उत्सव भरवण्यात आला आहे.
निसर्ग अंकुर या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वुई केअर आणि एनजीओ कम्पॅशन 24 ह्या संस्थेच्या आयोजनातून 'कंदमुळांचा उत्सव' हे महाराष्ट्रतील पहिलेच वेगवेगळ्या प्रजातींच्या रानकंदमुळांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
श्री. शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन क्लब कोल्हापूर, युथ ऍनेक्स, वुई केअर हेल्पलाईन ह्या संस्थांच्या सहकार्याने हे प्रदर्शन भरवले आहे. दिनांक 12 आणि 13 जानेवारी रोजी तब्बल 60 पेक्षा कंदमुळांचे माहितीपूर्ण प्रदर्शन कोल्हापुरातील शहाजी कॉलेज येथे सुरू आहे.
काय आहे हेतू?
निसर्गात कंदमुळे देणाऱ्या अनेक वनस्पती आहेत. अनेक कंदमुळांच्या वनस्पती ह्या रानावनात, जंगलात वाढतात. अशा रानकंद वनस्पतींबाबतचे पारंपरिक ज्ञान वनवासी, आदिवासी आणि कोकणवासीय यांच्याकडे आहे. अशा प्रकारच्या विविध रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर, याबाबतची माहिती शहरवासियांना आणि खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना व्हावी, शेतकऱ्यांनी अशा कंदमुळांची लागवड त्यांच्या शेतात करण्यासाठी प्रोत्साहित व्हावे हा या प्रदर्शनाच्या मागचा मुख्य हेतू आहे, अशी माहिती निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ वनस्पतीतज्ञ प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर यांनी दिली.
Makar Sankranti 2023 : कशी बनवतात भोगीची पारंपरिक भाजी? पाहा Video
अगदी पुरातन पौराणिक काळापासून मानव कंदमुळांचा अन्न म्हणून वापर करत आला आहे. त्यामुळे अशा कंदमुळांची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. त्यासाठीच कंदमुळांची योग्य ओळख आणि चांगली माहिती मिळवून देण्यासाठी मोहन माने यांची मदत घेण्यात आली आहे, असे वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी दिली आहे.
कोणत्या कंदमुळांचा समावेश?
या प्रदर्शनात कणगा, काटे कणग, कोराडू, करांदा, वराहकंद, वासकंद, पासपोळी, शेंडवेल, आळसी, शेवळा, सुरण ह्या वनस्पतींची कंदमुळे, कंदीका आणि कंदक तसेच मोठा कासार अळू, काळा अळू, हिरवा अळू, पांढरा पेरव, उंडे, शेडवाळे असे अळूंचे विविध प्रकार पाहयला मिळतील. त्याचबरोबर काळी हळद, आंबे हळद ह्या सारखे हळदीचे विविध प्रकार व त्यांचे कंद अळू, कमळं, सुरण अशा प्रकारच्या सुमारे 60 पेक्षा जास्त प्रकारच्या कंदाच्या जाती आणि प्रजातीची यामध्ये मांडणी केली आहे.
यापैकी 15 ते 20 प्रकारचे कंद विक्रीसाठी उप्लब्ध आहेत. तर सहा-सात कंदांच्या पाककृतीची माहिती देखील उपस्थितांना दिली जात आहे. या प्रदर्शनात हौशी खवय्यांना कंदापासून तयार केलेल्या विविध पदार्थाची चवही खाता येणार आहे.
कुठून आणली आहेत कंदमूळं?
या प्रदर्शनात ठेवण्यात आलेली कंदमुळं प्रामुख्याने कर्नाटकातील जोयडा, महाराष्ट्रातील बेल्हे (पुणे) व गगनबावडा (कोल्हापूर) येथून संकलित करण्यात आली आहेत.
35 रुपयांमध्ये पोटभर मिळणारी यादव भेळ, पाहा Video
हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामूल्य आहे. लेट्स गेट बँक टु अवर रूट्स अशा या प्रदर्शनाच्या ब्रीदवाक्याचा अंगिकार करून आपल्या मातीत वाढणाऱ्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक कंदमुळांची माहिती घेऊन चौकस आहारातून सुदृढ पिढी घडवण्यासाठी विद्यार्थी, आबालवृद्ध तसेच सर्व नागरिकांनी एकमेव वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा, असे आवाहन एनजीओ कम्पेंशन 24, कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड ह्यांनी केले आहे.
गुगल मॅपवरून साभार
पत्ता : शहाजी कॉलेज, दसरा चौक, कोल्हापूर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Local18, Local18 food