साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर, 06 फेब्रुवारी : कोल्हापूर जिल्ह्यातील बालकांची आरोग्य तपासणी करण्याच्या दृष्टीने संपूर्ण जिल्हयात 'जागरुक पालक सुदृढ बालक' हे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. त्यानुसार पुढचे 2 महिने जिल्ह्यातील प्रत्येक बालकाची आरोग्य तपासणी जिल्हा प्रशासन करणार आहे.
जिल्हा समन्वय समितीच्या पार पडलेल्या बैठकीत 6 फेब्रुवारी पासून राबवल्या जाणाऱ्या 'जागरुक पालक सुदृढ बालक’ अभियानाचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील शून्य ते अठरा वर्षांपर्यंतची सर्व बालके, किशोरवयीन मुले-मुली यांची प्राथमिक आरोग्य तपासणी या अभियानाच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये जर कोणी आजारी आढळले तर अशा बालकांवर त्वरित उपचार देखील केले जातील. गरजू आजारी बालकांवर औषधोपचार, शस्त्रक्रिया आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधाही पुरवल्या जातील. त्याचबरोबर सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन केले जाणार आहे. त्याबाबतच्या सूचना रेखावार यांनी दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली आहे.
कशा पद्धतीने पार पडेल हे अभियान ?
या अभियानांतर्गत जिल्ह्यातील शून्य ते अठरा वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येईल. यासाठी बाल आरोग्य तपासणी पथक स्थापन करण्यात आले आहे. गाव पातळीवर आणि तालुकास्तरावर त्या त्या ठिकाणी या पथकांकडून तपासणी करण्याचे नियोजन आहे. शासकीय, निमशासकीय, खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अंगणवाडी, अंध, मुक, मतिमंद, अस्थिव्यंग, दिव्यांग शाळेत, हे पथक भेट देईल. त्या त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाला भेट देण्याआधी पथकाकडून कल्पना दिल्या जातील, त्यानुसार त्या ठिकाणच्या सर्व विद्यार्थ्यांना तपासणी वेळी हजर राहता येईल.
रात्री शांत झोप लागत नाही? 'या' टिप्स करा फॉलो, तुम्हाला जाणवेल फरक! Video
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बालगृहे, बालसुधारगृहे, अनाथ आश्रम, समाज कल्याण आणि आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांसह ऊस तोड मजुरांची मुले, वीटभट्टीवर काम करणाऱ्यांची मुले अशा शाळाबाह्य बालकांचीही तपासणी होईल, यासाठी चोख नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे देखील डॉ. साळे यांनी सांगितले.
असे केले जातील औषधोपचार
या तपासणी पथकांच्या माध्यमातून नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखणे, रक्तक्षय, डोळ्यांचे आजार, गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कॅन्सर, अस्थमा, एपिलेप्सी यासह अन्य आजारांच्या संशयित रुग्णांना शोधले जाणार आहे. अशांवर नजिकच्या आरोग्य संस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व तपासण्या, औषधोपचार, शस्त्रक्रिया देखील करण्यात येतील. तर किशोरवयीन मुला-मुलींमध्ये आढळून येणारे शारीरिक व मानसिक आजार ओळखून त्यांच्यावरही आवश्यकतेप्रमाणे उपचार केले जातील.
दरम्यान आपल्या बालकाची आरोग्य तपासणी व्हावी, यासाठी पालकांनी देखील प्रयत्न करावेत. शाळेत न जाणाऱ्या लहान बालकांची आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.