साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर, 03 फेब्रुवारी : सध्या लहान मुलांमध्ये मोबाईल एक व्यसन बनत चालले आहे. पूर्वी रविवारचा दिवस म्हणजे मुलांचा सुट्टीचा, खेळण्याचा दिवस असायचा. पण आजकाल सुट्टीच्या दिवशी देखील मुले घरीच मोबाईल घेऊन बसलेली दिसतात. हाच रविवार कोल्हापूरच्या एका संस्थेच्या वतीने खेळांच्या माध्यमातून खेळून बागडून आनंदी बनवण्यात येणार आहे.
'मोबाईलमध्ये हरवलेला आजचा युवक' ही समाजापुढील मोठी समस्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे. त्याचबरोबर पुर्वीसारखे घरांना आता आंगण राहिलेले नाही, ज्याठिकाणी मुले विविध खेळ खेळू शकतील. एकमेकांतील संवादच हरवल्याने मुले मोबाईल आणि सोशल मिडियासारख्या आभासी जगामध्ये हरवत चालली आहेत. जगभरात काय चालले आहे हे माहित असणाऱ्या युवकांना आपल्या शहरात काय काय उपलब्ध आहे, याची बऱ्याचवेळा जाण नसते. यामुळेच मेरीड (इंडिया) संचलित कोल्हापुरातील सावली केअर सेंटर या संस्थेच्या वतीने हॅप्पी स्ट्रीट या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सावली सोशल सर्कल मैत्र महोत्सव, विज्ञान प्रदर्शन, कला महोत्सव, काव्यसंध्या, तंत्र महोत्सव, छंद महोत्सव, सॉफ्ट स्किल्स वर्ग, भारतीय भाषा वर्ग, श्रमप्रतिष्ठा जागर, व्यावसायिकता वृद्धी शिबिर असे वेगवेगळे सेमिनार्स आणि कार्यशाळा आयोजित करणार आहे. याचाच एक भाग म्हणून सावली सोशल सर्कलकडून 5 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारी रोजी कोल्हापूरच्या नवीन वाशी नाका येथे हॅपी स्ट्रीटचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष किशोर देशपांडे यांनी दिली.
काय काय असणार या हॅप्पी स्ट्रीटमध्ये
या हॅप्पी स्ट्रीटमध्ये 100 भारतीय वाद्यांचे प्रदर्शन, पुर्वांचलच्या मणिपूर राज्यातील नृत्य प्रकार आणि त्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग, फ्री स्टाईल फुटबॉलची विविध प्रात्यक्षिके, विसरत चाललेल्या खेळांची प्रात्यक्षिके, तरुणांना आपलेसे वाटतील असे शास्त्रिय नृत्यप्रकार, रॅप साँग्ज, कॅलिग्राफी, स्केचेस, विज्ञान प्रयोग, पथनाट्य असे अनेक मनोरंजनात्मक घटक असणार आहेत.
कोल्हापूरमध्ये Green Hydrogen जनरेटरचं यशस्वी संशोधन, पाहा काय होणार फायदे Video
मणिपुरी नृत्य असणार आकर्षण
या हॅप्पी स्ट्रीटच्या निमित्ताने 100 पारंपारिक आणि ऐतिहासिक अशा 100 वाद्यांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या निमित्ताने भारतभर वाजवल्या जाणाऱ्या विविध वाद्यांना पाहण्याची संधी मिळणार आहे. तर पूर्वांचलमधील मणिपूर राज्यातील थाबलचुंबा हा पारंपारिक नृत्यप्रकार आहे. याचे सादरीकरण पाहत तरुणांना ते नृत्य करायला देखील मिळणार आहे.
त्यामुळे अनेक मनोरंजनाचे घटक असणारा हा हॅप्पी स्ट्रीट रविवारच्या सकाळी भरणार आहे. या निमित्ताने स्वतःला तरुण समजणाऱ्या सर्वांनीच या हॅप्पी स्ट्रीटला भेट देण्याचे आवाहनही किशोर देशपांडे यांनी केले आहे.
पत्ता
नवीन वाशी नाका ते रत्ना पेट्रोल पंप रस्ता, राधानगरी रोड, कोल्हापूर.
वेळ : सकाळी 6 ते 10
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.