कोल्हापूर, 01 डिसेंबर : जेव्हा ‘स्क्रीन ॲडिक्शन’ चा विचार केला जातो, तेव्हा स्मार्ट फोन, कॉम्प्युटर, टीव्ही वापरणारी मुले किंवा किशोरवयीन मुलांची चर्चा होते. आजकाल स्क्रीन ॲडिक्शन इतकं वाढलं आहे की, कित्येकदा मुलांची त्यापासून सुटका करण्यासाठी उपचार देखील घ्यावे लागतात. अशा या स्क्रीन ॲडिक्शनच्या गंभीर समस्येवर कॉलेजच्या तरुणांनीच भाष्य केले आहे.
कोल्हापुरातील डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्क्रीन ॲडिक्शनवर एक शॉर्ट फिल्म बनवली आहे. आजकालची तरुण पिढी मोबाईलच्या वापरात किती गुंग असते, त्यामुळे त्यांचे काय काय नुकसान होते, नात्यांपासून ती कशी दुरावत जातात, हे सगळं त्यांनी त्यांच्या या स्क्रीन ॲडिक्शन नावाच्या शॉर्ट फिल्म मधून दाखवून दिले आहे.
Kolhapur : खंडोबा-म्हाळसा विवाहात 'या' हळदीला का असतो विशेष मान? Video
या शॉर्ट फिल्ममध्ये पूर्वी आणि आत्ता अशी तुलना दाखवण्यात आली आहे. पूर्वी मोबाईलचा वापर कमी असलेल्या विद्यार्थ्यांचे वर्तन आणि आत्ता स्क्रीन ॲडिक्शनच्या आहारी गेलेली तरुण पिढी अशी ही तुलना दाखवलेली आहे. 2013 पासून दैनंदिन स्क्रीन टाइम हा दिवसेंदिवस वाढत आहे. जागतिक स्तरावर 2022 मध्ये लोकांचा सरासरी स्क्रीन टाइम दररोज 6 तास 58 मिनिटे इतका वाढला आहे. अशी माहिती देखील या शॉर्ट फिल्मच्या शेवटी देण्यात आली आहे, अशी माहिती शंभूराज भोसले याने दिली आहे.
ही शॉर्ट फिल्म शंभूराज भोसले आणि पियूष वटकर यांनी त्यांच्या 20 जणांच्या टीम बरोबर बनवली आहे. शंभूराज भोसलेने या शॉर्ट फिल्मच्या डिरेक्शन, व्हिडिओग्राफी आणि एडिटिंगची जबाबदारी उचलली आहे. तर पियूष वटकरने या शॉर्ट फिल्मच्या लिखाण आणि सहाय्यक दिग्दर्शकाची बाजू सांभाळली आहे. त्याचबरोबर कॉलेजमध्ये प्रथम आणि द्वितीय वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे.
Kolhapur : शालेय सहलीत विद्यार्थ्यांचा थाट, 'ही' खास सोय होणार, Video
नुकतीच या शॉर्ट फिल्मने एका राष्ट्रीय स्तरावरील मूव्ही मेकिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक देखील प्राप्त केला आहे. या शॉर्ट फिल्मसाठी कॉलेजने देखील या विद्यार्थ्यांना सहाय्य केले आहे. कॉलेजचे प्राचार्य महादेव नरके यांनी स्क्रीन ॲडिक्शन या तरुणांच्याच समस्येवर तरुणांनीच भाष्य केल्यामुळे या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.