कोल्हापूर, 08 डिसेंबर: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील मलकापूर याठिकाणी काही दिवसांपूर्वी एका महिलेचे दागिने लुटल्याची घटना उघडकीस आली होती. कारमधून आलेल्या एका दाम्पत्याने 'आई, घरी सोडतो' असं म्हणत महिलेची लुट केली होती. आरोपींनी निर्जनस्थळी गेल्यानंतर पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी देत, त्यांच्या अंगावरील दागिने लुटले (Couple looted ornaments) होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर, गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं घटनेच्या 22 दिवसानंतर आरोपी दाम्पत्याला गजाआड (Couple arrested) केलं आहे.
सलमान मुबारक खान तांबोळी (वय-29) आणि त्याची पत्नी आयेशा तांबोळी (वय-24) असं अटक केलेल्या आरोपी दाम्पत्याचं नाव आहे. संबंधित आरोपी दाम्पत्य सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील नाईक बोमवाडी येथील रहिवासी आहेत. 16 नोव्हेंबर रोजी आरोपी दाम्पत्याने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मलकापूर येथील रहिवासी असणाऱ्या मंगल ज्ञानदेव कुंभार (52) यांना लुटलं होतं. आरोपींनी फिर्यादी महिलेच्या अंगावरील दागिने आणि मोबाइल घेऊन त्यांना वाटेत सोडून पोबारा केला होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अत्यंत शिताफीने सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
हेही वाचा-नगर हादरलं! कॉलेजच्या गेटसमोरून केलं अपहरण; बळजबरीनं लग्न लावत युवतीवर बलात्कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगल कुंभार ह्या 16 नोव्हेंबर रोजी मलकापूर येथील पेरीड नाका परिसरात रस्त्याच्या कडेला थांबल्या होता. त्याचवेळी आरोपी तांबोळी दाम्पत्य याठिकाणी कार घेऊन आले. आरोपींनी विश्वासात घेत 'आई, तुम्हाला कुठे जायचं आहे. चला घरी सोडतो' असं सांगितलं. विश्वास पटल्याने फिर्यादी आरोपींच्या कारमध्ये बसल्या. काही अंतर पुढे गेल्यानंतर एका निर्जनस्थळी आरोपींनी फिर्यादी मंगल यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या अंगावरील सोन्याचे सर्व दागिने जबरदस्तीने काढून घेतले.
हेही वाचा-उठता बसता पत्नीकडून सुरू होता छळ; पुण्यातील तरुणानं केला हृदयद्रावक शेवट
तसेच त्यांच्याकडील मोबाइलही आरोपींनी हिसकावला. यानंतर आरोपींनी फिर्यादी मंगल कुंभार यांना ज्योतिबा मार्गावरील केर्ली फाटा येथे रस्त्यावर उतरून पोबारा केला. या प्रकरानंतर घाबरलेल्या मंगल यांनी पोलिसांत जाऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गेली 22 दिवस कसून तपास करत आरोपी दाम्पत्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून चोरीसाठी वापरलेल्या कारसह 3 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kolhapur, Theft