सांगोला, 14 डिसेंबर: कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातून चोरीला गेलेली म्हैस सांगोल्यातील जनावरांच्या बाजारात सापडली आहे. करवीर तालुक्यातील कुडित्रे येथील रहिवासी असणाऱ्या महेश विलास पाटील यांची 5 डिसेंबर रोजी एक म्हैस आणि वासरू चोरीला गेलं होतं. अज्ञात चोरट्यांनी पाटील यांच्या शेतातील गोठ्यातून म्हैस आणि वासरू चोरून नेलं होतं. याप्रकरणी पाटील यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद देखील दाखल केली होती.
दरम्यान फिर्यादी पाटील हे आपल्या म्हशीला शोधण्यासाठी मित्रासोबत सांगोला येथील जनावरांच्या बाजारात गेले होते. सांगोल्यातील जनावारांच्या बाजारात गेलं असता, पाटील यांना त्यांची चोरी गेलेली म्हैस दिसली. म्हशीला पाहताचक्षणी त्यांनी आपल्या म्हशीला ओळखलं. पण ग्राहकाने ही म्हैस तुमचीच आहे, याचा पुरावा काय? असं म्हणत पाटील यांना फटकारलं. यावेळी महेश पाटील यांनी म्हैस सोडल्यावर कळेल असं म्हटलं. ग्राहकाने म्हशीला मोकळं सोडताच म्हैस मूळ मालकाच्या पाठीमागे ओरडत धावू लागली.
हेही वाचा-नाशकात मध्यरात्री हाणामारीचा थरार; मिठी मारल्याने वादाला फुटलं तोंड
चोरीची म्हैस विकत घेणं संबंधित ग्राहकाला चांगलंच महागात पडलं आहे. म्हैस खरेदी करणारे सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला टमटमसह ताब्यात घेतलं आहे. अन्य एका आरोपीचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचा-चोरीसाठी घेतली रजा; औरंगाबादेतील तरुणाने 6 लाखांवर मारला डल्ला, पोलीसही चक्रावले
संबंधित प्रकार रविवारी सांगोला येथील जनावरांच्या बाजारात उघडकीस आला आहे. आरोपींनी यापूर्वी देखील अशाप्रकारे अनेकांची जनावरं चोरून बाजारात विकली असावीत, असा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने पोलीस ताब्यात घेतलेल्या आरोपीची कसून चौकशी करत आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kolhapur