साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर 22 मार्च : कोल्हापूर ही कलानगरी आहे. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या धाटणीचे विषय विविध माध्यमांतून या ठिकाणी हाताळले जातात. असाच एक वेगळे कथानक आणि आशय असणारा 'गाभ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांची आहे. तर सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे या चित्रपटाचे निर्माते आहेत आणि सहनिर्माते अनुप जत्राटकर आहेत. या चित्रपटाचे जवळजवळ सर्वच चित्रीकरण कोल्हापुरात करण्यात आले आहे.
‘गाभ’ या चित्रपटात मुख्य भूमिका अभिनय क्षेत्रात सातत्याने नवे काही तरी करू पाहणाऱ्या कैलास वाघमारे याने साकारली आहे. कैलासची भूमिका आणि विषय संवेदशील असला, तरी त्याचा रोमँटिक अंदाजही प्रेक्षकांना दिसणार आहे. चित्रपटात एका मानसिकतेचे प्रतिनिधित्व करणारी भूमिका कैलास आपल्या ‘दादू’ या पात्रातून साकारणार आहे.
काय आहे भूमिका?
'आपल्या माजाला आलेल्या म्हशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून होणारा बदल आणि त्या बदलाची कथा अधोरेखित करणारा असा हा गावाकडच्या रांगड्या मातीतला ‘गाभ’ हा चित्रपट आहे. तर सर्वसामान्य माणूस त्याच्या गुण-दोषांसह ‘हिरो’ असू शकतो, हे दर्शवणारे हे दादुचे पात्र आहे, असं अभिनेता कैलासनं सांगितलं.
गावामध्ये रमली रुबिना दिलैक; चुलीवरच्या जेवणाचा घेतला आस्वाद, Video व्हायरल
या सिनेमातील अभिनेत्री सायली बांदकरनंही यावेळी तिचा अनुभव सांगितला. ' मी शहरी भागात वाढलेली असल्यामुळे पूर्णपणे अपरिचित अशा ग्रामीण भागाशी जुळलेल्या या कथानकामधील भूमिका खूपच आव्हानात्मक होती, माणसांसोबत काम करणं सोपं असतं, पण अनोळखी जनावरांच्या संगतीत काम करणं अवघड असते. एकदा जनावराचा विश्वास संपादन केला की ते तुम्हाला आपलेसे करते. त्या अर्थाने खूप काही शिकवणारा आणि समृद्ध करणारा अनुभव म्हणजे ‘गाभ’ चित्रपट आहे,' असं सायली म्हणाली.
एक विचार या चित्रपटातून मांडताना त्यातील आशावादही चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा ‘गाभ’केवळ ‘शारीरिक’ नसून ‘वैचारिक’देखील आहे. केवळ काहीतरी करूया म्हणून हा चित्रपट केलेला नाही, तर आजवर कधीही रुपेरी पडद्यावर आली नाही, अशी एक गोष्ट सादर करण्याचा हा प्रयत्न आहे. शहरी प्रेक्षकांनाही आवडेल असा हा चित्रपट आहे, असे चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आणि सहनिर्माते अनुप जत्राटकर यांनी सांगितले आहे.
6 वर्षांची चिमुरडी गाते तब्बल 15 भाषांमध्ये गाणी! पाहा भन्नाट Video
रेडा आणि म्हशीला सांभाळण्याचा अनुभव
या चित्रपटात अभिनेता, अभिनेत्री यांच्याबरोबरच रेडा आणि म्हशीने देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे रेडा आणि म्हशीला सांभाळताना कैलाश आणि सायली दोघांनाही वेगवेगळे अनुभव आले. सायली शहरी भागातील असल्यामुळे या प्राण्यांना समजून घेऊन त्यांच्याबरोबर काम तिला करावे लागले. तर गावाशी नाळ जोडली असलेल्या कैलाशने चक्क रेड्या बरोबरच या चित्रपटात डान्स केला आहे. हे करताना काही औरच मजा आली, असेही कैलास सांगतो.
कोल्हापूरच्या मातीत तयार झालेला गाभ सुरुवातीला विविध चित्रपट महोत्सवात दाखवला जाईल. त्यानंतर तो चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला मे किंवा ऑगस्ट महिन्यात आणण्याचा दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांचा प्रयत्न आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Local18, Marathi cinema, Marathi entertainment