जगात भारी...कोल्हापुरी! फेसबुकवर पार पडला जवानाचा विवाह सोहळा, 270 जण झाले सहभागी

विवाहसोहळा पार पाडत असताना सोशल डिस्टन्सिंगची योग्य ती काळजी घेण्यात आली.

विवाहसोहळा पार पाडत असताना सोशल डिस्टन्सिंगची योग्य ती काळजी घेण्यात आली.

  • Share this:
कोल्हापूर, 16 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे जो लॉकडाऊन पुकारण्यात आलाय त्याचा फटका लग्नाळू मंडळींना पण बसला आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यात या परिस्थितीतही एक लग्न पार पडलं. मात्र हा विवाहसोहळा पार पाडत असताना सोशल डिस्टन्सिंगची योग्य ती काळजी घेण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे या लग्नात तब्बल 270 हून अधिक नातेवाईक सहभागी झाले होते पण तेही ऑनलाईन. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील अर्जुनवाडी या गावातील अविनाश दोरुगडे आणि चंदगड तालुक्यातील कुदनुर गावातील रूपाली निर्मळकर या दोघांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. फक्त पुजारी आणि वधू वर हे तिघेजण याच या लग्नाला उपस्थित होते तेही मास्क बांधून. या तिघांनीही सोशल डिस्टन्स ठेवूनच हा विवाहसोहळा पार पाडला. महत्त्वाचं म्हणजे दोन ते तीन फेसबुक अकाउंटवरून 270 व्हराडी या लग्न सोहळ्यात सहभागी झाले होते आणि त्यांनी ऑनलाईन अक्षता टाकत वधू-वराला शुभेच्छा दिल्या. या जोडप्यांनी लग्नामध्ये जमलेला अहेर मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकच्या माध्यमातून केलेला हा विवाह सोहळा चंदगड गडिंग्लज परिसरात कौतुकास्पद ठरला आहे. नवरदेव अविनाश हा सीआरपीएफमध्ये असून त्याची नेमणूक सध्या झारखंडमध्ये आहे तर रूपाली ही पदवीधारक आहे. चंद्रपूरमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे नातेवाईकांनी दिले होते दाम्पत्याला आशीर्वाद लॉकडाऊनचे उल्लंघन न करता सोशल डिस्टन्सिंग पाळत काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातही एक विवाहसोहळा पार पडला होता. ब्रह्मपुरी इथे हा विवाह सोहळा झाला असून नातेवाइकांनी व्हिडिओ कॉलद्वारे विवाहित दाम्पत्याला शुभाशिर्वाद दिले. ब्रह्मपुरी इथल्या नरेंद्र म्हस्के यांचा मुलगा विशालचे लग्न नागझरीतल्या लक्ष्मी हिच्याशी ठरले होते. मात्र लॉकडऊनमुळे लग्न कसे होणार याचा प्रश्न होता. मात्र लग्नातील इतर कार्यक्रम रद्द करून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय़ दोन्ही कुटुंबीयांनी घेतला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता अत्यंत साध्या पद्धतीने हा विवाह उरकण्यात आला. विवाहाच्या विधीवेळी सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं. लग्नानंतर सर्व नातेवाईकांनी वधुवरांना व्हिडिओ कॉल करून आशीर्वाद दिले. संपादन - अक्षय शितोळे
First published: