कोल्हापुरात आघाडीने उडवला भाजपचा धुव्वा, सेनेनं राखली लाज!

कोल्हापुरात आघाडीने उडवला भाजपचा धुव्वा, सेनेनं राखली लाज!

कोल्हापुरात दहा जागांपैकी युतीला फक्त एकच जागा मिळाली तर काँग्रेस राष्ट्रवादीने 6 जागा जिंकल्या.

  • Share this:

कोल्हापूर, 24 ऑक्टोबर : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास जाहीर झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये युतीला फक्त एक जागा जिंकता आली. आघाडीच्या उमेदवारांनी भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांचा धुव्वा उडाला आहे. तर सेनेला सहापैकी एकच जागा वाचवता आली. जिल्ह्यात सर्वात जास्त चर्चा होती ती कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाची. या ठिकाणी भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्याविरुद्ध पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांचे आव्हान होते. अटीतटीची लढत होईल असे वाटत असताना प्रत्यक्षात ऋतुराज पाटील यांनी बाजी मारली. कोल्हापूर उत्तरमधून सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांना काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांनी हरवलं.

इचलकरंजी मतदारसंघात भाजपच्या सुरेश हाळवणकर यांना अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे यांनी 49 हजार 810 मतांनी पराभूत केलं. तर हातकणंगलेत राजू आवळे यांनी विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेचे सुजित मिणचेकर यांचा पराभव केला. शिरोळमधून सेनेच्याच उल्हास पाटील यांना राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील यांनी पराभूत केलं.

राजकारणाचं विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागलमध्ये युतीला मोठा झटका बसला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार समरजीत घाटगे आणि शिवसेनेचे संजय घाटगे यांचा पराभव केला. भाजपने उमेदवारी नाकारल्यानं समरजित घाटगेंनी अपक्ष निवडणूक लढवली. यात त्यांनी हसन मुश्रीफ यांना कडवी झुंज दिली. संजय घाटगे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.चंदगडमध्ये राष्ट्रवादीच्या राजेश पाटील यांनी बाजी मारली. शिवसेनेचे संग्राम कुपेकर आणि भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांचा पराभव झाला. शिवाजी पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली.

काँग्रेसपेक्षाही NCPची ताकद मोठी, एकट्या पवारांच्या जीवावर निवडणुकीचा खेळ बदलला!

शाहुवाडी मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान आमदारांना पराभव पत्करावा लागला. शिवसेनेचे सत्यजित पाटील सरूडकर यांना पराभूत करून जनसुराज्यच्या विनय कोरे यांनी बाजी मारली. 2014 च्या निवडणुकीत विनय कोरे यांना सत्यजित पाटील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. करवीरमध्ये चंद्रदीप नरके यांना पराभूत करून काँग्रेसच्या पीएन पाटील यांनी बाजी मारली. जिल्ह्यात सेनेचे एकमेव आमदार प्रकाश आबीटकर यांनी विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादीच्या केपी पाटील यांच्याविरुद्ध 18 हजार मतांनी विजय मिळवला.

‘लेक निघाली सासरला’, पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मिम्स व्हायरल

गेल्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात सेनेचे सहा आणि भाजपचे दोन आमदार निवडून आले होते. तर दोन ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी बाजी मारली होती. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. यावेळी काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत जिल्ह्यात 4 जागा जिंकल्या तर राष्ट्रवादीने दोन जागा जिंकल्या.

पश्चिम महाराष्ट्रात एकूण 66 विधानसभेच्या जागा असून 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेला 12, भाजपला 22, राष्ट्रवादीला 18, काँग्रेसला 10 तर रासप, शेकपा, एमएनएस आणि अपक्ष असे प्रत्येकी एक जागा जिंकली होती.

त्याआधी 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक 23 आणि काँग्रेसला 14 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर भाजप 10 आणि शिवसेनेला 9 जागा मिळाल्या होत्या. तर तब्बल 7 जागी अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकपा आणि एमएनएसला एक जागा मिळाली होती.

2014 च्या निवडणुकीत काय झालं?

2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 07:18 PM IST

ताज्या बातम्या