कोल्हापूर : कोल्हापूरच्या रांगणा किल्ल्यावर (Kolhapur Rangana Fort) पार्टी करण्यासाठी आलेल्यांना झालेल्या मारहाणीवरून जोरदार राडा झाला आहे. जिल्ह्यातले चार तरुण किल्ल्यावर फिरायला गेले होते, तेव्हा त्यांना किल्ल्यावर एक ग्रुप दारू आणि बकरा घेऊन पार्टी करण्यासाठी आलेले दिसले. किल्ल्यावर दारू प्यायला बंदी आहे, असं सांगत या चौघांनी पार्टी करायला आलेल्या एकासोबत हाणामारी केली. या व्यक्तीला काठीने मारून नाक घासायला लावलं, तसंच या सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग करून व्हायरलही केलं. या मारहाणीत युवक जखमी झाल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आलं.
26 जानेवारीची ही घटना आहे. किल्ल्यावरच्या मारहाण झाल्यानंतर युवकाने ग्रामस्थांना किल्ल्याच्या पायथ्याशी बोलवून घेतलं. गावातल्या तरुणाला मारणाऱ्या या चौघांचा शोध त्यांनी घेतला आणि कोल्हापूरला परत जात असताना त्या चौघांनाही पकडलं. खोलीमध्ये कोंडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यांनाही नाक घासून माफी मागायला लावण्यात आली.
या सगळ्या राड्यानंतर पोलिसांनी ऋषीकेश माने, प्रसाद माने, उमेश माने आणि विजय गुरव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्वत:ला शिवप्रेमी म्हणवणाऱ्या ऋषिकेश मानेचे याआधीही असे प्रकार समोर आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.